Vidhan Sabha 2019: ...तर युती तुटणार? संजय राऊतांचा रावतेंच्या सुरात सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:20 PM2019-09-19T12:20:12+5:302019-09-19T12:30:03+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - जागावाटपाबाबत योग्य तोडगा निघत नसल्याने राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीचे घोडे अडले आहे.
मुंबई - जागावाटपाबाबत योग्य तोडगा निघत नसल्याने राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीचे घोडे अडले आहे. दरम्यान, जागावाटपात शिवसेनेला समान जागा न मिळाल्यास युती तुटू शकते, असे विधान शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी केले केले होते. आता रावतेंच्या या विधानाला संजय राऊत यांनीही पाठिंबा दिला आहे. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या वाटाघाटीत समान जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे रावतेंनी केलेले विधान चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.
Shiv Sena's,Sanjay Raut on Maharashtra Min Diwakar Raote's statement 'if Shiv Sena doesn't get half the seats then alliance could break':If 50-50 seat sharing formula was decided upon before Amit Shah Ji&CM,then his statement isn't wrong.Chunaav sath ladenge,kyun nahi ladenge pic.twitter.com/m2fbggbgyt
— ANI (@ANI) September 19, 2019
विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आली तरी भाजपा आणि शिवसेना अशा दोन्हीकडील नेते आपापल्या पक्षाला हव्या असलेल्या जागांचा आकडा रेटून सांगत आहेत. वर युती होणारच, असे सांगून वेळ मारून नेत आहेत. त्यादरम्यान, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते यांनी विधानसभा निवडणुकीत 144 जागा मिळाल्या तर युती अन्यथा युती तुटण्याची शक्यता आहे, असे विधान एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले होते. त्यामुळे युतीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही रावतेंच्या सुरात सूर मिसळला आहे. रावतेंनी केलेल्या विधानाविषयी विचारले असता राऊत म्हणाले की, ''विधानसभेसाठी प्रत्येकी 50 टक्के जागा वाटून घ्यायच्या हा फॉर्म्युला अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेत ठरला होता. त्यामुळे रावतेंनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे, असे म्हणता येणार नाही.''
यावेळी युतीबाबत विचारले असता राऊत यांनी आम्ही निवडणूक एकत्रच लढणार. का नाही एकत्र लढणार? असे सांगत युती होण्याची शक्यता अद्याप कायम असल्याचेही संकेत दिले.
दरम्यान, दिवाकर रावते यांच्या विधानावरुन भाजपा मंत्री गिरीश महाजन यांनी ज्यांना युतीबाबत बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी बोलू नये असं सांगत दिवाकर रावतेंवर टीका केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच युतीबाबत निश्चित सांगू शकतात. पण शिवसेना-भाजपा युती 100 टक्के होणारच असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.