Vidhan Sabha 2019: विक्रोळीत सेनेपुढे टिक टिकचा ठोका...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:11 PM2019-09-25T23:11:23+5:302019-09-25T23:11:36+5:30
आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वसाहत असलेल्या विक्रोळी विधानसभा क्षेत्रात सेनेच्या उमेदवारासोबत टिक टिकचा चेहरा स्पष्ट झाला आहे.
मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वसाहत असलेल्या विक्रोळी विधानसभा क्षेत्रात सेनेच्या उमेदवारासोबत टिक टिकचा चेहरा स्पष्ट झाला आहे. त्यात आता वंचित आणि मनसेचा उमेदवार कोण असणार? त्यावरुन येथील निवडणूक रंगणार आहे.
नाहूरपासून विक्रोळीपर्यंत विस्तारलेला विक्रोळी विधानसभा मतदारसंघात आशिया खंडातील सर्वात मोठी कामगार वसाहत आहे. त्यामुळे कामगारांचे प्रश्न, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकासाबरोबरच येथील कांजूर ड़म्पिंग ग्राऊण्डच्या मुद्यावर यंदाची विधानसभा निवडणूक रंगणार आहे. त्यात, सेनेकडून आमदार सुनील राऊत यांनाच संधी देण्यात आल्याने ते कामाला लागले आहेत.
तर, दुसरीकडे कॉंग्रेसमधून संदेश म्हात्रे तर राष्ट्रवादीकडून धनंजय पिसाळ या दोघांमध्ये अंतर्गत धुसपूस सुरु होती. त्यात, पिसाळ यांनी नुकतेच त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना येथून संधी देण्यात आल्याचे निश्चित झाले आहे. आणि सेनेच्याही डोक्यात टिक टिक सुरु झाली आहे. दोघेही तयारी लागले असले तरी, अजूनही या विभागातून मनसे आणि वंचितचा चेहरा अजूनही अस्पष्ट आहे. लोकसभेला वंचितच्या उमेदवाराला या विभागातून जास्तीचे मते मिळाली होती. २००९ मध्ये मनसे लाटेत आमदार मंगेश सांगळे यांनी, सेनेचे दत्ता दळवी तसेच माजी खासदार संजय पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांचा पराजय करत, दुप्पट मतांनी विजय मिळवला. २०१४ मध्ये खासदारकी हरल्यानंतर, संजय पाटील हे आमदारकी मिळविण्यासाठी राष्ट्रवादीकडून विक्रोळी विधानसभेसाठी स्वत: रिंगणात उतरले.
मात्र, सेनेच्या संजय राऊत यांनी त्यांचा तब्बल ३२ हजार ९०२ मतांनी पराजय केला होता. पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर पोहचले होते. मनसेचे सांगळे २४ हजार ९६३ मतांनी दुस-या क्रमांकावर होते. त्यानंतर सांगळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशात मनसेची लाट या भागात कमी झाली असली तरी, उमेदवार कोण असणार? यावरुनही नानाविध चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे वंचित आणि मनसेचा चेहरा स्पष्ट होताच या भागात चौरंगी लढत पहावयास मिळणार आहे.