Vidhan Sabha 2019 : विलेपार्ले मतदारसंघाला काय हवं ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 01:58 AM2019-09-19T01:58:36+5:302019-09-19T01:58:54+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -मतदार संघाला बरेच काही हवे आहे.
आमदाराचे नाव : पराग अळवणी (भाजप)
मतदारसंघ : विलेपार्ले
मतदार संघाला बरेच काही हवे आहे. वाहतूक कोंडी सुटली पाहिजे. झोपड्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे. इमारतींचा पुनर्विकास झाला पाहिजे. पायाभूत सेवा सुविधांचा विकास झाला पाहिजे.
>हे घडलंय...
पाणी पुरवठयाबाबत ८ नव्या जलजोडण्या दिल्या. १० विहिरींची सफाई केली. १६ बोअरवेल दिल्या. २२ ठिकाणी अस्तित्त्वात असलेल्या मैदाने/उद्यानांच्या सुशोभिकरणासाठी निधी वापरला. डीपीच्या मसुद्यावर ३५ बाबींवर सूचना मांडल्या. विकासास होत असलेल्या अडथळ्यांवर उपाय सुचविले. विमानतळ फनेल झोन बाधित इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण व प्रवर्तन नियमावलीत तरतूद केली. अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई केली. वाहतूक कोंडीबाबत पाठपुरवा केला. रस्ते बांधणी, शौचालय दुरुस्ती, डेÑनेज लाईन, बोअरवेल, व्यायामशाळा, गटारे, सोलार दिव्यांकरिता आमदार निधी वापरला. भाडेकरूंना दुरुस्तीची परवानगी दिली. भाडेकरूंना इमारत पुनर्बांधणीचा अधिकार देण्यासाठी कायद्यात बदल व्हावा म्हणून काम केले.
>हे बिघडलंय...
फनेल झोनचा विषय मार्गी लागलेला नाही.
वाहतूक कोंडीचे तीनतेरा वाजले आहेत.
इमारतींचा पुनर्विकास नाही.
विमानतळालगतच्या झोपड्या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.
>विलेपार्ले मतदारसंघ
विलेपार्ले येथील भाजपचे आमदार पराग अळवणी यांची या विधानसभा मतदार संघावर एकहाती सत्ता आहे. कार्यकर्त्यापासून नगरसेवक आणि आमदारापर्यंत मजल मारताना अळवणी यांनी हा परिसर उत्तमरित्या बांधून ठेवला आहे. महत्त्वाचे म्हणजे अळवणी यांचा केवळ मतदार संघाचा नाही तर मुंबईचा उत्तम अभ्यास आहे. विमानतळ परिसरातील फनेल झोन आणि विमानतळ परिसरातील झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत अळवणी कार्यरत आहेत. असे असले तरी अद्याप युती आणि आघाडीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. विधानसभेची आचारसंहिता केव्हाही जाहिर होण्याची शक्यता असून, येथे भाजपला कोणता पक्ष टक्कर देतो? या पाहणेही तेवढेच औत्सुक्याचे ठरणार असून, हे चित्र दोनएक महिन्यात स्पष्ट होईल.
>पाच वर्षांत काय केलं?
उन्नत महाराष्ट्र अभियानासाठी काम केले. कोकण पर्यटन समितीतंर्गत सभेत मार्गदर्शन केले. मधापासून वाईन बनविण्यासाठी धोरणात्मक निर्णयासाठी कार्यरत राहिलो. दुष्काळी भागांचे दौरे केले. लातूर, रत्नागिरीमधील शेतकरी वर्गाचे प्रश्न समजावून घेतले. भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्यात सक्रीय राहिलो. शक्तीकेंद्र स्तरावर दरवर्षी प्रवास, जनसंपर्क अभियान, पंडित दिनदयाळ उपाध्यय जन्मशताब्दी समारोहसाठी काम केले.
>विधिमंडळातील कामगिरी
७५५ तारांकित प्रश्न विचारले. २०७ लक्षवेधी सुचना मांडल्या. ५० अशासकीय ठराव मांडले. ६ औचित्याचे मुद्दे मांडले. ५ अशासकीय विधेयके मांडली.
१२ चर्चा केल्या. १० शासकीय विधेयक मांडली. शैक्षणिक विषयावर ५१, आरोग्यावर ६४, कायदा व सुव्यवस्थेवर ९६, मुंबईवर १७, महिला कल्याणावर ७, बालविकासावर २०, भ्रष्टाचारावर ६, कामगाराविषयी ४, पायाभूत सेवा सुविधांविषयी ६, विकास आराखड्यावर ६, गृहनिर्माणविषयी २७, पुनर्वसन ४ असे करत २४ राज्यस्तरीय समस्या मांडल्या.
>फनेल झोनचा विषय मार्गी लागलेला नाही. विमानतळालगतच्या झोपड्यांचे पुनर्वसन झालेले नाही. रस्ते, फुटपाथ, शौचालयांबाबत पुरेशी कामे झालेली नाहीत. सोसायटी आणि इमारतींकडे लक्ष देताना झोपड्यांमधील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. या गोष्टींकडे अधिकाधिक लक्ष देणे गरजेचे होते. मात्र असे होताना दिसत नाही ही खंत आहे.
- संदीप दळवी, महाराष्ट्र उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
>त्यांना काय वाटतं?
काम चांगले झाले की नाही हे ठरविण्याचा अधिकार संधी दिलेल्या पक्षाच्या नेत्यांचा व मतदारांचा. मी माझ्या पुर्ण क्षमतेने काम केले. कोणत्याही कारणाने काम टाळले नाही. कळत नसेल तर इतरांचे मार्गदर्शन घेऊन प्रत्येक विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. जनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून समस्यांशी परिचय करून घेतला. पाच वर्षांत २८ हजार नागरिकांनी कार्यालयात दाखल होत प्रश्न मांडले. सुचना केल्या. पदाधिकारी यांनी दिलेल्या वेळेमुळे मतदार संघात काम करू शकलो.
- पराग अळवणी,
आमदार, विलेपार्ले
>विलेपार्ले हा मराठी भाषिक परिसर म्हणून ओळखला जात असतानाही २००४, २००९ आणि २०१४ या विधानसभेत शिवसेनेचा पराभव झाला. मागील ३ विधानसभा निवडणूकीचा विचार करता विलेपार्ले विधानसभेवर दोनवेळा काँग्रेसचा उमेदवार तर एक वेळा भाजपाचा उमेदवार विजयी झाला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असून, युती आणि आघाडीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. मात्र तरिही भाजप येथील आपली खुर्ची टिकविणार की? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
विलेपार्ले हा मराठी भाषिक परिसर म्हणून ओळखला जात असतानाही २००४, २००९ आणि २०१४ या विधानसभेत शिवसेनेचा पराभव झाला. मागील ३ विधानसभा निवडणूकीचा विचार करता विलेपार्ले विधानसभेवर दोनवेळा काँग्रेसचा उमेदवार तर एक वेळा भाजपाचा उमेदवार विजयी झाला आहे. विधानसभा निवडणूक तोंडावर असून, युती आणि आघाडीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. मात्र तरिही भाजप येथील आपली खुर्ची टिकविणार की? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
>TOP वचनं
पाणीपुरवठा
मैदान/उद्याने
विकास आराखडा
मलनि:सारण वाहिनी
वाहतूककोंडी
जुन्या इमारतींचा पुनर्विकास करणार