Vidhan Sabha 2019: सायन कोळीवाडा मतदारसंघाला काय हवं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 01:52 AM2019-09-20T01:52:07+5:302019-09-20T01:54:58+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीतून सुटका करणे, सांडपाण्याची व्यवस्था, आरोग्यासाठी अधिक प्राधान्य मिळावे, अशी मतदारांची मागणी आहे.
>आमदाराचे नाव : तमील सेल्वन
मतदारसंघ : सायन कोळीवाडा
झोपडपट्टी पुर्नविकास प्रकल्प, स्वच्छता, पाणीपुरवठा, वाहतूक कोंडीतून सुटका करणे, सांडपाण्याची व्यवस्था, आरोग्यासाठी अधिक प्राधान्य मिळावे, अशी मतदारांची मागणी आहे.
>हे घडलंय...
सायन कोळीवाड्यातील रस्त्यांची दुरुस्ती
कॉन्व्हेंट शाळेसाठी जागा मंजूर करुन घेतली आहे
युवा पिढीसाठी व्यायाम शाळा
सायन रुग्णालयाची दर्जोन्नती, खाटांची संख्या वाढविणे प्रस्ताव मंजूर
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सिंग्नलची व्यवस्था
२३ शौचालयाची कामं झाली, १० शौचालयांची कामं प्रगतीपथावर
>हे बिघडलंय...
एसआरए प्रकल्पाने आकार घेतलेला नाही.
पाणीमाफिया, वीज माफियांचे फावतेय
वाहतूक कोंडीची मोठी समस्या आहे.
>सायन कोळीवाडा
दक्षिण भारतीय मतदारांची कौल सायन कोळीवाडा मतदारसंघात निर्णायक राहिले आहे. यामुळेचं काँग्रेसचे जगन्नाथ शेट्टी दोनवेळा या ठिकाणी निवडून आले. २०१४ मध्ये भाजपने नगरसेवक तमील सेल्वन यांना संधी दिली. मोदी लाट आणि दक्षिण भारतीयांची साथ यामुळे ते विजयी झाले. या मतदारसंघात काँग्रेसनेही यंदा जोर लावला आहे. या मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी तीन असे एकूण नऊ नगरसेवक आहेत. विरोधी पक्षनेते रवी राजा आणि काँग्रेचे युवा नेता गणेश यादव येथून इच्छुक आहेत.
>पाच वर्षांत काय केलं?
सायन कोळीवाड्यातील रस्त्यांची कामं, २३ शौचालयं उभारण्यात आली. बालवाडी, गरीब जनतेला तीन वर्षांसाठी भाडे दिल्यानंतर एसआरए प्रकल्प राबविणे, रोजगार निर्मितीचा प्रयत्न, व्यायाम शाळा, डोनेशन न घेणारी कन्व्हेंट शाळा उभारण्यासाठी जागा मंजूर करुन घेतली आहे. सायन रुग्णालयाची दर्जोन्नती, खेळाचे मैदान, ग्रंथालय आदी कामं पूर्ण केली तर काही कामं प्रगतीपथावर आहेत.
>विधिमंडळातील कामगिरी
प्रजा संस्थेच्या आमदारांच्या कारकीर्दीच्या परिक्षण अहवालात सेल्वन यांना ३१ वे स्थान दिले आहे. विधीमंडळात त्यांनी ९० टक्के उपस्थिती दर्शविली असून २०१४ ते २०१८ या कालावधीत १३२ प्रश्न विचारले. पावसाळी अधिवेशनात सर्वाधिक म्हणजे ३३ प्रश्न विचारले. २०१४ व २०१५ साली सेल्वन यांनी एकही प्रश्न उपस्थित केला नाही. तर २०१६ व २०१७ साली अनुक्रमे १ आणि ३४ प्रश्न उपस्थित केले. सेल्वन यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले असून उद्योग विश्वात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
>त्यांना
काय वाटतं?
पाच वर्षांच्या कालावधीत जेवढी लोकापयोगी कामं करता येईल ती केली. तरीही अनेक कामं माझ्या अजेंडावर आहेत. त्यामुळे मी अजूनही समाधानी नाही. सायन कोळीवाड्यात एकही झोपडपट्टी राहू नये, प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, असे माझे स्वप्न आहे. यासाठी जास्तीजास्त एसआरए प्रकल्प यावे. २०११ पर्यंतचा पुरावा असला तरी आता एसआरएमध्ये घर मिळणार आहे. ग्रंथालय, व्यायामशाळा, शाळा, खेळाचे मैदान आणि रुग्णालय अशी दर्जेदार सेवा लोकांना मिळावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
- तमील सेल्वन,
आमदार, भाजप
>सायन रुग्णालयात दादर, वडाळा, माटुंगा येथील सर्व रेल्वे व रस्ते अपघातातील रुग्ण येत असतात. त्यामुळे तीन हजार ६०० खाटा वाढविण्याची मागणी केली जात होती. सायन रुग्णालयाची दर्जोन्नती तीन टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे. रुग्णालयाच्या पुनर्विकासात तीन इमारती बांधल्या जाणार आहेत. पूर्व उपनगरातील या सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या दर्जोन्नतीमुळे लाखो गरीब रुग्णांना फायदा होणार आहे. यासाठी आपण पाठपुरावा केला असल्याचा सेल्वन यांचा दावा आहे.
>झोपडपट्टी पुर्नविकास योजना मोठ्या प्रमाणात राबविण्याची गरज आहे. परंतु गेल्या पाच वर्षांमध्ये असे कोणते काम झाल्याचे दिसून येत नाही. वाहतुकीची मोठी समस्या आहे. स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत. विकासाचे कोणतेही झालेले नाही. विद्यमान आमदारांनी नगरसेवक असतानाही आणि आमदार झाल्यावरही मतदारसंघात फारसा प्रभाव पाडलेला नाही.
- रवी राजा, विरोधी पक्षनेते, महापालिका
>ळडढ 5 वचनं
रस्त्यांची डागडुजी
वाहतुकीची समस्या सोडविणे
कॉन्व्हेंट शाळा सुरु करणे
रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न
एसआरए प्रकल्प राबविणे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाचे मैदान तयार करणार आहे