Join us

Maharashtra Election 2019 : रक्ताच्या नात्याला झुकतं माप मिळणार?; वरळीतील मनसेचे इच्छुक माघारीसाठी तयार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 3:52 PM

Worli Vidhan Sabha Election 2019 : यंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे वरळी, या मतदारसंघाचं वैशिष्ट यासाठी की ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात वरळीचा समावेश नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुतणे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे राज काका मनसेचा उमेदवार न उतरवून पुतण्याला अप्रत्यक्षपणे मदत करणार का, अशी चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर, मनसेच्या वरळीतील इच्छुकांनी माघारीची तयारी दर्शवत रक्ताच्या नात्याला झुकतं माप मिळण्याचे संकेत दिले आहेत.

यंदाच्या निवडणुकीत सर्वात जास्त लक्ष लागलेला मतदारसंघ म्हणजे वरळी, या मतदारसंघाचं वैशिष्ट यासाठी की ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. बाळासाहेबांनी आयुष्यात एकही निवडणूक लढविली नसली तर बाहेर राहून त्यांनी सरकारचं रिमोट कंट्रोल हाती घेतलं होतं. युती सरकारच्या काळात खुद्द मुख्यमंत्री बाळासाहेबांचा आदेश घेण्यासाठी मातोश्रीवर येत होते. मात्र काळ बदलला तसेत राजकारणाचा पिंड बदलला. ठाकरे घराण्यातील चौथी पिढी राजकारणात आली आहे. युवासेनेच्या माध्यमातून आदित्य यांनी राजकारणात उडी घेतली. महाविद्यालयीन निवडणुकांच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी आपलं कर्तृत्व दाखवून दिलं. 

ठाकरे घराण्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मतभेद असले तरी संकटावेळी हे कुटुंब एकत्र येताना नेहमी पाहायला मिळतं. उद्धव ठाकरेंच्या आजारपणावेळी राज ठाकरे यांनी मनसे येथील अलिबाग दौरा रद्द करुन लिलावती हॉस्पिटल गाठलं होतं. उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर स्वत: राज ठाकरेंनी गाडी चालवून मातोश्रीवर त्यांना घेऊन गेले होते. बाळासाहेबांच्या अखेरच्या काळात ठाकरे कुटुंबाची जवळीक वाढली होती. अलीकडेच राज ठाकरेंची कोहिनूर मिल प्रकरणी ईडी चौकशी करण्यात आली यावेळी उद्धव ठाकरेंनी या चौकशीतून काहीही निष्पन्न होणार नाही असं सांगत राज ठाकरेंना पाठिंबा दिला होता. त्यामुळे ठाकरे घराण्यातील इतिहासात पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने राज ठाकरे वरळीतून मनसे उमेदवार देणार नसल्याची भूमिका घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. याबाबत अद्यापतरी कोणतीही अधिकृत भूमिका आली नसली तर मनसेतील इच्छुकांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे जो निर्णय घेतली तो अंतिम असेल असं सांगितलं आहे.  

टॅग्स :आदित्य ठाकरेराज ठाकरेउद्धव ठाकरेमनसेवरळीमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019विधानसभा निवडणूक 2019