Join us

Vidhan Sabha 2019: शिवसेनेचं गुजराती प्रेम! आदित्य ठाकरे विचारताहेत 'केम छो वरली'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2019 9:30 AM

शिवसेनेची वरळीत गुजरातीत बॅनरबाजी

मुंबई: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेवरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास सज्ज झाले आहेत. सोमवारी त्यांनी आपली जाहीर केली. त्यानंतर काल प्रसिद्ध झालेल्या शिवसेनेच्या पहिल्या उमेदवार यादीतही त्यांच्या नावाचा समावेश आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे पहिले ठाकरे ठरलेल्या आदित्य यांचे वरळी विधानसभा क्षेत्रातील बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. आदित्य यांचा फोटो असलेल्या आणि केम छो वरली अशी विचारणा करणाऱ्या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.  वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या उमेदवारीची घोषणा होताच त्यांचे बॅनर झळकले. गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी आदित्य यांच्या बॅनरवर गुजराती भाषेचा वापर करण्यात आला आहे. शिवसेनेनं मराठीतही बॅनर लावले असले, तरीही सर्वाधिक चर्चा गुजराती बॅनरची होत आहे. मराठी माणसाच्या न्याय आणि हक्कांसाठी लढणारा पक्ष अशी शिवसेनेची ओळख सांगितली जाते. मात्र मतांसाठी शिवसेनेला मराठीचा विसर पडलाय का, असा सवाल सोशल मीडियावरुन उपस्थित केला जात आहे.  आदित्य ठाकरेंच्या गुजराती बॅनरवरुन सोशल मीडियानं शिवसेनेला धारेवर धरलं आहे. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न आहे. उद्योगधंदे गुजरातला नेले जात आहेत, अशी टीका शिवसेनेनं अनेकदा केली आहे. त्याच टीकेची आठवण सोशल मीडियावर अनेकांनी करुन दिली आहे. हाच का शिवसेनेचा मराठी बाणा, असे प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. मराठी मराठी करणाऱ्या शिवसेनेला आता त्याच मराठीचा सोयीस्कर विसर पडल्याची टीकाही अनेकांनी केली आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019आदित्य ठाकरेवरळीशिवसेनाविधानसभा निवडणूक 2019