Maharashtra Vidhan Sabha 2024: कुटुंबीय, कार्यकर्त्यांसह उमेदवार रंगले ऐसपैस गप्पांमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 12:31 PM2024-11-22T12:31:12+5:302024-11-22T12:33:48+5:30
Maharashtra Vidhan Sabha 2024: राजकारणाबरोबरच अन्य विषयांवरही त्यांच्यात चर्चा झाल्या. काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या तसेच समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत गेले अनेक दिवस प्रचारासाठी पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या बहुतेक उमेदवारांनी मतदानानंतर गुरुवारी आराम केला, ते काहीसे रिलॅक्स झालेले दिसत होते. काही उमेदवारांनी देवदर्शन केले. तर बहुतांश उमेदवारांनी कुटुंबाला वेळ दिला. खूप दिवसांनी ते कुटुंबासोबत गप्पांमध्ये रंगले होते. राजकारणाबरोबरच अन्य विषयांवरही त्यांच्यात चर्चा झाल्या. काही उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या तसेच समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या गाठीभेटी घेतल्या. मतमोजणीच्या दिवशी कोणावर कोणती जबाबदारी असेल, याचाही आढावा काहींनी घेतला.
विलेपार्ले मतदारसंघातील भाजपचे उमेदवार पराग अळवणी यांचा दिनक्रम गुरुवारी पूर्वीप्रमाणेच सुरू झाला. सकाळी थोडे उशिरा उठल्यानंतरही प्राणायाम आणि योगासने केली. त्यानंतर बऱ्याच दिवसांनी कुटुंबासोबत निवांतपणे चहा-नाष्टा करून ते एका विवाह सोहळ्याला हजर राहिले. त्यानंतर त्यांनी दुपारनंतर आपल्या कार्यालयात कार्यकर्ते आणि नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत त्यांच्याकडून सदिच्छाही स्वीकारल्या.

मालाड पश्चिमेतील काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांनी सकाळी कार्यालय गाठत कार्यकर्त्यांची भेट घेत मतदानाचा आढावा घेतला. दुपारी १२ ते ३ पर्यंत ते रिटर्निंग ऑफिसरच्या कार्यालयात गेले. तिथून घरी गेल्यावर भोजन आणि थोडी विश्रांती घेतली. सायंकाळी पुन्हा त्यांनी कार्यालय गाठले. त्यानंतर मतदान प्रशिक्षणाची तयारी करण्याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
दिंडोशीतील उद्धवसेनेचे उमेदवार सुनील प्रभू हे मतदानाच्या दिवशी मध्यरात्री २ वाजता झोपले, तरी गुरुवारी त्यांचा दिवस सकाळी नेहमीप्रमाणे सुरू झाला. निवडणुकीमुळे ट्रेडिंगच्या व्यवसायाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे त्यांनी त्यासंदर्भात बैठक घेतली. दुपारी सरकारी कामानिमित्त ते वांद्र्याला गेले. रात्री उशिरापर्यंत गोरेगावच्या कार्यालयात त्यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या.
जोगेश्वरी पूर्वेतील उद्धवसेनेचे उमेदवार अनंत नर यांनी मतदार आणि पक्षाचे कार्यकर्ते यांचे आभार मानले. त्याचबरोबर सकाळी कार्यालयात येऊन राहिलेली कामे पूर्ण केली. तर, दुपारी शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले.
घाटकोपर पश्चिमेतील भाजपचे उमेदवार राम कदम यांनी गुरुवारी दिवसभर पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. दिवसभर भेटायला आलेल्या अनेकांशी त्यांनी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी कुटुंबासोबत वेळ व्यतीत केला. मतमोजणी संदर्भात कार्यकर्त्यांना काही सूचना केल्या.
मानखुर्द-शिवाजीनगर येथील शिंदेसेनेचे उमेदवार सुरेश पाटील दिवसभर मतदार संघातच तळ ठोकून होते. कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी मतदानाचा आढावा घेतला. त्याचबरोबर शनिवारी होणाऱ्या मतमोजणीबाबतही चर्चा केली. भेटायला आलेल्या अनेकांशी त्यांनी गप्पा मारल्या.
घाटकोपर पूर्वेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवार राखी जाधव यांनी दीड महिना परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांची गुरुवारी विचारपूस केली. त्यानंतर कुटुंबीयांसोबत काही वेळ घालवला. मतदारसंघात फेरफटका मारून काही मंडळींशीही संवाद साधला.
कुर्ल्यातील उद्धवसेनेच्या उमेदवार प्रवीणा मोरजकर यांनी गुरुवारी शाखेत दाखल होत कार्यकर्त्यांची भेट घेतली. सर्वसामान्य नागरिकांचे फोन घेत त्यांचे आभार मानले. मतदान झाल्यापासून गुरुवारी रात्रीपर्यंत मतदारांचे फोन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भाजी विक्रेत्या भगिनी यांचे आभार मानताच त्यांनी शुभेच्छा दिल्याचे सांगितले. दिवसभर व्यस्त असल्याने स्वत:साठी वेळच काढता आला नसल्याचे त्या पुढे म्हणल्या.
कांदिवली पूर्वेतील भाजप उमेदवार अतुल भातखळकर यांनी गुरुवारी दिवसभर घरी आराम केला आणि कुटुंबासमवेत वेळ घालवला. कार्यकर्तेही खूप थकले होते. शुक्रवारी सकाळपासून पुन्हा नव्या जोमाने आणि उमेदीने कामाला सुरुवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील महिनाभर प्रचारासाठी मेहनत घेणारे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे त्यांनी आभार मानले. आपण चांगल्या मताधिक्यांनी तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मागील महिनाभरापासून माहीम मतदारसंघ पिंजून काढणारे मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांचा मतदानानंतरचा दुसरा दिवसही काहीसा व्यस्त गेला. अमित यांनी आपल्या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा गुरुवारी सुरू ठेवला होता. माहीममधील मतदानाचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला.
मुंबई भाजपचे अध्यक्ष व वांद्रे पश्चिम मतदारसंघातील उमेदवार ॲड. आशिष शेलार यांनी निवडणुकीत अपेक्षित यश मिळावे, यासाठी तुळजापूरला सहकुटुंब भवानीदेवीचे दर्शन घेतले. प्रचारादरम्यान त्यांना अनेक बाबींचा सामना करावा लागला होता, स्वतःच्या मतदारसंघांसोबतच पक्षीय जबाबदारी म्हणून अन्य मतदारसंघांमध्येही लक्ष द्यावे लागले होते. आता जो काही निकाल मुंबई किंवा राज्यात येईल, तो शांतपणे स्वीकारण्याची आपली तयारी आहे. मात्र, आता यापुढे पक्षाकडून कोणतीच अपेक्षा नसल्याने पक्षाने आपला विचार करू नये, कदाचित पक्षातील काही वरिष्ठांना आपल्या मूल्यमापनानंतर आपण इथपर्यंतच ठीक असल्याचे वाटत असावे, असे वक्तव्यही त्यांनी केले.

चारकोपमधील भाजपचे उमेदवार योगेश सागर आणि त्यांचे कार्यकर्ते गुरुवारी मतमोजणीच्या तयारीच्या कामाला लागलेले होते. पोलिंग एजंटच्या आवश्यक फाइल तयार करणे, मतमोजणीसाठी आवश्यक साहित्य तयार करून ठेवणे या कामात ते गुंतले होते. सागर यांचा दिवस धकाधकीचा नसला तरी कार्यकर्त्यांच्या कामाचे मॉनिटरिंग सुरू होते. याशिवाय कार्यकर्ते व नेत्यांचे फोन आणि आभार प्रदर्शन ही सुरू होते.