‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान; रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 02:56 PM2024-11-21T14:56:15+5:302024-11-21T14:57:13+5:30
या सवलतीचा लाभ घेणाऱ्यांमध्ये कमर्शिअल स्टाफ, मोटारमन, गार्ड, ट्रेन ऑपरेशनशी संबंधित कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांचा समावेश होता.
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी खास सवलत दिली होती. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सेवा बुधवारी १०० टक्के सुरू असल्याने प्रशासनाने रेल्वे कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत चार तासांची विशेष सुट्टी दिली होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी रेल्वेची नियमित सेवा अबाधित राहिली असून, प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे, यासाठी सुट्टी देण्यात आली होती.
मध्य आणि पश्चिम रेल्वेने सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून त्यांच्या ड्यूटीच्या वेळेनुसार चार तासांची सुटी घेऊन मतदानाचा हक्क बजावला. या सवलतीचा लाभ घेणाऱ्यांमध्ये कमर्शिअल स्टाफ, मोटारमन, गार्ड, ट्रेन ऑपरेशनशी संबंधित कर्मचारी आणि इतर अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांचा समावेश होता.
१२ अतिरिक्त लोकल
मतदानाच्या ड्यूटीवरील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेतर्फे बुधवारी १२ अतिरिक्त लोकल चालविण्यात आल्या. मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण अप-डाउन आणि सीएसएमटी ते पनवेलदरम्यान या लोकल चालविण्यात आल्या.
व्यवस्था प्रशंसनीय
रेल्वे कर्मचाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी केलेली व्यवस्था प्रशंसनीय असल्याचे मत अनेक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले.
“आम्ही नेहमी प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत असतो. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मिळालेली ही संधी आमच्यासाठी महत्त्वाची होती,” असे एका मोटारमनने सांगितले.
निवडणुकीच्या काळात सरकारी यंत्रणांवर मोठी जबाबदारी असते. मात्र, अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, लोकल दिवसभरात वेळेवर धावल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळाले.