मुंबईचा गड कोण करणार सर?; जनजागृतीनंतर उत्साहात ५३.५५ टक्के मतदान
By सचिन लुंगसे | Published: November 21, 2024 02:47 PM2024-11-21T14:47:13+5:302024-11-21T14:48:10+5:30
मुंबईच्या रिंगणात ४२० उमेदवार असून त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवारी मुंबईचा गड कोण सर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सचिन लुंगसे,मुंबई
Maharashtra Election 2024: गेल्या २० दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर बुधवारी मुंबईत कोणताही मोठा गोंधळ न होता उत्साहात मतदान झाले. निवडणूक अधिकाऱ्यांकडून रात्री ११ वाजेपर्यंत आलेल्या माहितीनुसार सरासरी ५३.५५ टक्के मतदान झाले. लोकसभेच्या तुलनेत मतदानात सुमारे दीड टक्का वाढ झाली, असे निवडणूक आयोगाकडून आलेल्या प्राथमिक माहितावरून स्पष्ट होत आहे.
मुंबईच्या रिंगणात ४२० उमेदवार असून त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. शनिवारी मुंबईचा गड कोण सर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभेत मतदानावेळी झालेल्या गोंधळानंतर प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेत मतदारयाद्यांच्या घोळापासून अनेक अडचणींवर मात केली. निवडणूक आयोगाने केलेल्या जनजागृतीमुळे मतदानाचा टक्का वाढला.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत मुंबईच्या पूर्व-पश्चिम उपनगरासह दक्षिण आणि दक्षिण मध्य मुंबईत सुरू असलेल्या मतदानाने दुपारी आणि सायंकाळी वेग पकडल्यानंतर मुंबईच्या मतदानाच्या टक्क्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.
मुंबईच्या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रयत्न सुरू असतानाच मुंबई महापालिकेनेही कंबर कसली होती.
मुंबईत ठिकठिकाणी तात्पुरती आणि कायमस्वरूपी मतदान केंद्रे उभी करत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पुरेशा सेवा सुविधा कशा मिळतील यासाठी प्रयत्न केले, त्याचा फायदा झाला. मतदानाची प्रक्रिया सकाळी सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि गृहिणींनी मतदान करत आपले कर्तव्य बजावले. दुपारी मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग मतदानासाठी बाहेर पडला. मुंबईत एक-दोन ठिकाणचा गोंधळ वगळता शांततेत मतदान झाले.
प्रशासनातर्फे मतदारांचे जोरदार स्वागत
प्रशासनातर्फे मुंबईतील विविध मतदारसंघांमध्ये ८४ मॉडेल मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. त्यामध्ये संपूर्णत: युवा कर्मचाऱ्यांद्वारे संचालित, महिलांद्वारे संचालित तसेच दिव्यांगांद्वारे संचालित मतदान केंद्रांचा समावेश होता.
विलेपार्ले येथील संत झेवियर माध्यमिक शाळेत सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते. हे संपूर्ण मतदान केंद्र फुलांनी सजविण्यात आले होते. अनेक ठिकाणी मतदारांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
सात हजार स्वयंसेवक मदतीसाठी होते तत्पर
मतदारांच्या मदतीसाठी ७ हजार ११५ स्वयंसेवक विविध मतदान केंद्रांवर कार्यरत होते. यामध्ये ९८ महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजनेत (एनएसएस) सहभागी २ हजार ८०० विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) ७५० विद्यार्थी, नागरी संरक्षणातील ३२३ सदस्य, आपदा मित्र, सखी २००, नेहरू युवा केंद्राचे ३८ सदस्य आणि अन्य ३,००४ सदस्य यांचा समावेश होता. या स्वयंसेवकांनी मतदान केंद्रांवर दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांना साहाय्य, रांगांचे व्यवस्थापन आदी जबाबदाऱ्या योग्यपणे पार पाडल्या.