Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. राज्यात आज अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस होता. यामुळे राज्यभरात अर्ज दाखल करण्यासाठी नेत्यांची मोठी गर्दी होती. राज्यात २८८ जागांसाठी निवडणुकीकरिता आज २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ७ हजार ९९५ उमेदवारांचे १० हजार ९०५ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
सीएम एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षात तीनपट वाढ; जाणून घ्या एकूण संपत्ती किती?
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख होती. आजपर्यंत आलेल्या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरुच होते. दरम्यान, आता आज अखेर अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत संपली आहे, आता ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येणार आहे. यानंतर ४ नोव्हेंबर दिवशी अर्ज माघार घेता येणार आहे. यानंतर राज्यातील लढती ठरणार आहेत.