Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे. जरांगे पाटील यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली असून या मागणीला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी उमेदवार उभा करणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनीही २८८ उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर केलंय. यामुळे आता विधानसभा निवडणुकीत चांगलीच रंगत येणार असल्याचं दिसतंय.
शरद पवारांना Z + दर्जाची सुरक्षा, विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आज मुंबईत होते. यावेळी त्यांनी 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी बहुजन पार्टी राज्यात २८८ उमेदवार उभे करणार असल्याचं जाहीर केलं. प्रकाश शेंडगे म्हणाले, ओबीसी बहुजन पार्टीचे राज्यातील नेते आज मुंबईत बैठकीसाठी उपस्थित होते. या बैठकीत आम्ही विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचं ठरलं आहे. आरक्षणाची लढाई आम्ही मतपेटीतून लढवण्याचं ठरवलं आहे. प्रत्येक जिल्ह्यातून उमेदवार देणार असून प्रत्येक जातीला प्रतिनिधीत्व मिळणार आहे, असंही शेंडगे म्हणाले.
"या उमेदवारांच्या मागे ओबीसी समाज उभा राहील, ही निवडणूक आम्ही ताकदीने लढणार आहे. उमेदवारांची चाचणी येत्या काही दिवसात करणार आहे. आता ही निवडणूक पक्षाच्या पलिकडे गेली आहे. ही निवडणूक ओबीसी विरुद्ध मराठा अशीच होणार आहे. ओबीसींच्या बाजूने कुठलाच नेता नाही. त्यामुळे आता आम्हीच निवडणूक लढणार आहे. आमच्या आरक्षणाविरोधात जो आहे त्यांच्याविरोधात आम्ही निवडणूक लढवणार आहे. समविचारी आमदारांना पाठिंबा देण्याबाबतही आमची चर्चा झाली आहे. आरक्षणवाद्यांनी आरक्षणावाद्यांना मतदान केलं पाहिजे, असंही प्रकाश शेंडगे म्हणाले.
'वंचित'ची आधी व्याख्या काय ठरवावी
वंचितच्या नेत्यांनी आधी वंचितची व्याख्या ठरवावी. लोकसभा निवडणुकीत त्यांनी सांगलीत वसंतदादांच्या नातवाला पाठिंबा दिली. धनदांडग्यांना त्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे आता जे कोणी आमच्या आरक्षणाची बाजू घेईल त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत, असंही शेंडगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील यांनीही २८८ जागा लढवणार असल्याचे केले जाहीर
सगेसोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य न झाल्यास मी मैदानात उतरणार, राज्यात सगळ्या जातींना सोबत घेत २८८ जागा लढवणार अशी घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राजकारण माझा मार्ग नाही. मराठा एकत्र आल्याने तुमची लोकसभेला फजिती झाली, हे संकेत आहेत. माझ्या नादी लागू नका. सगेसोयरे अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच ही मागणी मान्य करा एवढीच माझं म्हणणं आहे. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. मला माझ्या समाजातील पोरं मोठी करायची आहे. समाजाला ताकद द्यायची आहे. जर तुम्ही हे नाही केले तर २८८ जागांवर मी सर्व जातीचे उमेदवार उतरून गोरगरिबांना निवडून आणणार. सर्व जातीधर्माचे लोक घेणार मग मी मागे हटणार नाही. त्यावेळी नाव घेऊन कुणाला पाडायचे हे सांगेन असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला.