Join us

शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 5:55 PM

शिवडी मतदारसंघात इच्छुक असलेले सुधीर साळवी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटात बंडखोरी होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीत शिवडी मतदारसंघात ठाकरेंकडून कोण लढणार यावरून बराच सस्पेन्स होता. शिवडी मतदारसंघात विद्यमान आमदार अजय चौधरी आणि विभाग संघटक सुधीर साळवी हे इच्छुक होते. या जागेवर कुणाला उमेदवारी द्यायची हा पेच असल्याने पहिल्या यादीत शिवडी मतदारसंघाचा समावेश नव्हता. आज मातोश्रीवर शिवडी मतदारसंघातील इच्छुक आणि पदाधिकारी नेत्यांची बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत अखेर उद्धव ठाकरेंकडून विद्यमान आमदार अजय चौधरी यांनाच पुन्हा उमेदवारी देण्यावर शिक्कामोर्तब केल्याचं समोर आले आहे.

मातोश्रीवर जवळपास दीड तास शिवडी मतदारसंघाबाबत चर्चा सुरू होती. अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यापैकी कुणाला उमेदवारी द्यायची यावर पदाधिकाऱ्यांशी चर्चाविनिमय करण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले की, संकटकाळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी माझ्यासोबत राहिले. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देतोय. तुम्ही सर्वांनी काम करा. त्यानंतर अजय चौधरी यांना ग्रीन सिग्नल मिळताच सुधीर साळवी हे उद्धव ठाकरेंना नमस्कार करून बाहेर निघाले. आपण शिवसेनेसोबत काम करणार असं सुधीर साळवींनी माध्यमांना सांगितले. 

गेल्या १० वर्षापासून अजय चौधरी शिवडी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. परंतु यावेळी शिवडी लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाचे सुधीर साळवी हे निवडणूक लढण्यास इच्छुक होते. मागील काही काळापासून सुधीर साळवी शिवडी मतदारसंघात सक्रीय होते. त्यामुळे या मतदारसंघात तिकीट मिळवण्यासाठी विद्यमान आमदार अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यात रस्सीखेच सुरू होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांच्या पारड्यात कौल दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अजय चौधरी हे ठाकरेंसोबत कायम राहिले. त्यामुळे निष्ठावंत अजय चौधरींना उमेदवारी मिळणार हे अनेकजण बोलत होते. आजच्या बैठकीनंतर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

शिवडीत रंगणार तिरंगी लढत

शिवडी मतदारसंघात २००९ साली मनसेचे बाळा नांदगावकर विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत याठिकाणी अजय चौधरी यांनी मनसे उमेदवाराचा पराभव केला. २०१९ च्या निवडणुकीत बाळा नांदगावकरांऐवजी या मतदारसंघात मनसेनं संतोष नलावडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र यंदा पुन्हा एकदा बाळा नांदगावकर यांना रिंगणार उतरवलं आहे. त्यात ठाकरे गटाकडून या मतदारसंघात पुन्हा अजय चौधरींना संधी दिली आहे. आता महायुतीकडून या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे शिवडी मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४शिवडीमुंबई विधानसभा निवडणूकउद्धव ठाकरेमनसेअजय चौधरीशिवसेना