Devendra Fandnavis : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. महायुतीने २२५ जागांवर आघाडी मिळवली आहे, तर महाविकास आघाडीला केवळ ५६ जागांवर आघाडी मिळवली आहे. विधानसभेच्या या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देताना आपण महाराष्ट्रातील जनतेपुढे नतमस्तक होत असल्याचे म्हटलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लाडक्या बहिणींचेही आभार मानले. तसेच आम्ही आधुनिक अभिमन्यू असून चक्रव्यूह भेदल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमतापेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. भाजपने जवळपास १३० जागा जिंकल्या असून ५४ जागा या शिवसेना शिंदे गटाने जिंकल्या आहेत. या मोठ्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आम्ही आधुनिक अभिमन्यू, चक्रव्यूह तोडलं असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जनतेने विरोधकांना कृतीतून उत्तर दिलं असल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“लोकसभेच्या निवडणुकीत जो फेक नरेटीव्ह तयार करण्यात आला होता. त्या फेक नरेटीव्हच्या विरोधात लढणाऱ्या सर्व संघटनांचा हा विजय आहे. महाराष्ट्रात लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या सर्वांचा हा विजय आहे. गावागावात सगळीकडे जाऊन हा अलख जगवला हा विजय त्यांचा आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आणि आमच्या महायुतीच्या एकजुटीचा हा विजय आहे. मी अमित शाह यांचे देखील आभार मानतो. तसेच लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो. महाराष्ट्रातील जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहेत. जनतेने विरोधकांना कृतीतून उत्तर दिलं आहे”, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.
“मी याआधीही सांगितलं होतं की आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. चक्रव्यूह तोडून दाखवला. महाराष्ट्र मोदींजींच्या पाठीशी खंबीर उभा आहे. मी याआधी म्हटलं होतं आणि आताही सांगतो की या विजयात माझा खूप छोटासा वाटा आहे. मला असं वाटतं की कोणत्याही लोकशाहीमध्ये एक चांगला विरोधीपक्ष असणं गरजेचा आहे. त्यामुळे जे विरोधी पक्षाचे लोक निवडून आलेले आहेत. त्यांचा आम्ही सन्मान करू. त्यांचा आवाज छोटा असो की मोठा असो. ते ज्या गोष्टी सांगतील त्या योग्य गोष्टीवर आम्ही त्यांना प्रतिसाद देऊ," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.