Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 06:30 AM2024-11-25T06:30:44+5:302024-11-25T06:31:43+5:30
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: भायखळ्यात २०१४च्या निवडणुकीत एमआयएमचे वारीस पठाण यांच्यामागे अल्पसंख्याक समाज उभा राहिला होता. त्यामुळे त्यांना विजय मिळाला होता पण यावेळी हा समाज उद्धवसेनेचे मनोज जामसुतकर यांच्या पाठी उभा राहिला.
महेश पवार
वरिष्ठ प्रतिनिधी
महामुंबईमध्ये भायखळा, माहीम, वांद्रे (पूर्व), कलिना, जोगेश्वरी (पूर्व), कुर्ला, चांदिवली, मुंबादेवी, धारावी, मालाड, अणुशक्तीनगर, मानखुर्द, मुंब्रा-कळवा, भिवंडी हे अल्पसंख्याक बहुल मतदारसंघ मानले जातात. या समाजाचे १३ उमेदवार निवडणुकीसाठी रिंगणात होते. त्यातील ६ उमेदवार विजयी झाले आहेत. तसेच, समाजाच्या निर्णायकी मतांचा फायदा मविआला झाल्याचे निकालाअंती समोर आले आहे.
लोकसभा निवडणुकीत प्रतिनिधित्व न दिल्याने हा समाज नाराज होता. त्यामुळे उद्धवसेना, काँग्रेस, शरद पवार गट, अजित पवार, समाजवादी पक्ष यांनी विधानसभेत समाजाला प्रतिनिधित्व देऊन नाराजी कमी करण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीतील काँग्रेसने अमीन पटेल (मुंबादेवी), असिफ झकेरिया (वांद्रे पश्चिम), नसीम खान (चांदिवली), अस्लम शेख (मालाड), मुझफ्फर हुसेन (मीरा भाईंदर), असे ५ उमेदवार दिले होते. शरद पवार गटाने फहाद अहमद (अणुशक्तीनगर), उद्धवसेनेने हारून खान (वर्सोवा) आणि समाजवादी पक्षाने अबू आझमी (मानखुर्द), रईस शेख (भिवंडी पूर्व) असे उमेदवार दिले होते. तर, महायुतीमधील अजित पवार गटाने नवाब मलिक (मानखुर्द), सना मलिक (अणुशक्तीनगर), झिशान सिद्दीकी (वांद्रे पूर्व), नजीब मुल्ला (मुंब्रा कळवा), असे ४ उमेदवार दिले.
भायखळ्यात २०१४च्या निवडणुकीत एमआयएमचे वारीस पठाण यांच्यामागे अल्पसंख्याक समाज उभा राहिला होता. त्यामुळे त्यांना विजय मिळाला होता पण यावेळी हा समाज उद्धवसेनेचे मनोज जामसुतकर यांच्या पाठी उभा राहिला. त्यामुळेच त्यांना ८० हजार मते घेता आली. मुंबादेवीमध्ये ७७ हजार मते घेऊन काँग्रेसचे अमीन पटेल विजयी झाले. धारावीमध्ये मुस्लीम, दलित असा संमिश्र समाज आहे. एकनाथ गायकवाड यांनी बांधलेला हा मतदारसंघ अजूनही काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. त्यामुळे ज्योती गायकवाड यांना येथून विजय मिळविता आला. अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक (अजित पवार गट) आणि फहाद अहमद (शरद पवार गट) यांच्यात लढत होती. मतदारांनी सना मलिक यांच्या बाजूने कौल दिला.
मानखुर्दमध्ये दोन्ही अल्पसंख्याक आमदार एकमेकांसमोर आले होते. अजित पवार गटाचे नवाब मलिक आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यात मतदारांनी आझमी यांना ५४,७८० मते देऊन विजयी केले. तर, भिवंडी येथील ‘सपा’चेच रईस शेख यांचाही विजय झाला. मालाडमधून काँग्रेसचे अस्लम शेख यांनाही विजयी केले. १३ पैकी ६ अल्पसंख्याक आमदारांना विधानसभेत पोहोचता आले आहे.