Join us

"राज ठाकरेंना राईट टर्न दाखवला होता, पण त्यांनीच..."; CM शिदेंवरील टीकेला मनीषा कायंदेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 3:55 PM

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्याच सभेत महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. ठाण्यातल्या सभेत राज ठाकरे यांनी  शिवसेना आणि धनुष्यबाणावरील मालकी संदर्भावरूनही राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेवर टीकास्त्र डागलं होतं.  शिवसेना आणि धनुष्यबाण  एकनाथ शिंदेंची प्रॉपर्टी नसल्याचे राज ठाकरेंनी म्हटलं. राज ठाकरेंच्या या टीकेला आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांना लक्ष करत आहेत. ठाण्यात बोलताना राज ठाकरे यांनी पक्ष आणि चिन्हावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. आता शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरेंवर टीका केली आहे. राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य सकाळी केलं की संध्याकाळी केलं पाहावं लागेल, असा खोचक टोला मनीषा कायंदे यांनी लगावला आहे.

"राज ठाकरे यांच्या विषयी मला जास्त बोलायचं नाहीये. ते कधी कुठली भूमीका घेतात आणि काही बोलतात. त्यांनी हे वक्तव्य केलं ते कुठल्या वेळी केलं सकाळी केलं की संध्याकाळी केलं. राज ठाकरे यांना आम्ही व्यवस्थित राईट टर्न दाखवला होता. पण त्यांनीच रॉंग टर्न घेतला तर आम्ही काय करु," असं मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे.

कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही - अजित पवार

"काहीजण म्हणतात अमुक चोरलं तमुक चोरलं. कुणी कुणाचं काहीही चोरलेलं नाही. त्यामध्ये आमदार महत्त्वाचे असतात. संघटना, संघटनेतील जिल्हाध्यक्ष महत्त्वाचे असतात. संघटनेतील कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. त्यांच्यावर संघटना चालत असते. संघटना कुणा एकाच्या मालकीची नसते," असं प्रत्युत्तर अजित पवारांनी दिलं होतं. काय म्हणाले होते राज ठाकरे?

"शिवसेना आणि धनुष्यबाण ना उद्धव ठाकरेंची प्रॉपर्टी आहे ना एकनाथ शिंदेंची आहे, ती प्रॉपर्टी बाळासाहेबांची प्रॉपर्टी आहे. माझे शरद पवारांच्या भूमिकांबद्दल मतभेद आहेत, पण तरीही एक गोष्ट सांगेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह ही शरद पवारांची प्रॉपर्टी आहे ती अजित पवारांची नाही," असं विधान राज ठाकरेंनी केलं होतं.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकराज ठाकरेएकनाथ शिंदे