Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवडी विधानसभेवरून ठाकरे गटात तिढा वाढला? सुधीर साळवींच्या पोस्टने चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 10:41 AM2024-10-25T10:41:57+5:302024-10-25T10:51:25+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवडी विधानसभेतून अजय चौधरी यांना तिकीट जाहीर केले.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : गेल्या काही दिवसांपासून शिवडी विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाकडून कोण लढणार या चर्चा सुरू होत्या. अजय चौधरी यांच्यासह सुधीर साळवी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, अखेर काल गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी अजय चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यामुळे सुधीर साळवी यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टने राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
सुधीर साळवी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी 'निष्ठावंत शिवसैनिकांनो मला तुमच्याशी बोलायचं आहे!'असा मजकूर या पोस्टमध्ये लिहिला आहे. आज शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता लालबाग मार्केटमधील शिवसेना शाखेजवळ सुधीर साळवी आपल्या समर्थकांसोबत जाहीर संवाद साधणार आहेत. दरम्यान, आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
सुधीर साळवी यांच्या समर्थकांमध्ये नाराजी
अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवडी मधील सुधीर साळवी यांच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. लालबाग शिवसेना शाखेसमोर समर्थकांची मोठी गर्दी झाली.
शिवडीत सुधीर साळवी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत भाऊ, तुम्ही निर्णय घ्या अशी मागणी केली. सुधीर साळवी या समर्थकांना समजावून सांगत होते, मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अजय चौधरी यांची उमेदवारी बदलावी अन्यथा आम्ही राजीनामा देऊ अशी आक्रमक भूमिका साळवी समर्थक ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे शिवडीत ठाकरे गटाच्या उमेदवारीवरून मोठी नाराजी पसरल्याचं चित्र समोर आले आहे.
शिवसेनेती उभी फूट पडल्यानंतर अजय चौधरी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रोहिले आहेत. यामुळेच त्यांना ठाकरेंनी पुन्हा संधी दिली. तर दुसरीकडे सुधीर साळवी यांचेही शिवडी विधानसभा मतदारसंघात ताकद आहे. ते गेल्या तीन दशकांपासून या मतदारसंघात काम करतात, त्यांनीही विधानसभेच्या उमेदवारीसाठी दावा केला होता.