सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 11:09 PM2024-10-24T23:09:43+5:302024-10-24T23:12:47+5:30

शिवडी मतदारसंघात नाराजीनाट्य, अजय चौधरी यांना उमेदवारी दिल्याने ठाकरे गटातील सुधीर साळवी समर्थक संतापले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 - Uddhav Thackeray group displeased in Shivdi Constituency, Sudhir Salvi supporters upset after Ajay Chaudhary was nominated | सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी

सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी

मुंबई - शिवडी मतदारसंघात ठाकरे गटाकडून विद्यमान आमदार अजय चौधरी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मातोश्रीवर आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे या मतदारसंघातील इच्छुक सुधीर साळवी नाराज असल्याचं समोर आले आहे. मातोश्रीवरील बैठकीनंतर साळवी थेट लालबागला त्यांच्या घरी गेले. मात्र संध्याकाळपर्यंत साळवींना उमेदवारी नाकारल्याचं समजताच लालबाग शिवसेना शाखेसमोर समर्थकांची मोठी गर्दी झाली.

शिवडीत सुधीर साळवी समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत भाऊ, तुम्ही निर्णय घ्या अशी मागणी केली. सुधीर साळवी या समर्थकांना समजावून सांगत होते, मात्र कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अजय चौधरी यांची उमेदवारी बदलावी अन्यथा आम्ही राजीनामा देऊ अशी आक्रमक भूमिका साळवी समर्थक ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे शिवडीत ठाकरे गटाच्या उमेदवारीवरून मोठी नाराजी पसरल्याचं चित्र समोर आले आहे.


मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं?

शिवडीतील पेच सोडवण्यासाठी आज मातोश्रीवर जवळपास दीड तास चर्चा सुरू होती. अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यापैकी कुणाला उमेदवारी द्यायची यावर पदाधिकाऱ्यांशी चर्चाविनिमय करण्यात आली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले की, संकटकाळात सर्वजण सोडून जात असताना अजय चौधरी माझ्यासोबत राहिले. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देतोय. तुम्ही सर्वांनी काम करा. त्यानंतर अजय चौधरी यांना ग्रीन सिग्नल मिळताच सुधीर साळवी हे उद्धव ठाकरेंना नमस्कार करून बाहेर निघाले. आपण शिवसेनेसोबत काम करणार असं सुधीर साळवींनी माध्यमांना सांगितले होते. 

शिवडीत रंगणार तिरंगी लढत

शिवडी मतदारसंघात २००९ साली मनसेचे बाळा नांदगावकर विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत याठिकाणी अजय चौधरी यांनी मनसे उमेदवाराचा पराभव केला. २०१९ च्या निवडणुकीत बाळा नांदगावकरांऐवजी या मतदारसंघात मनसेनं संतोष नलावडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र यंदा पुन्हा एकदा बाळा नांदगावकर यांना रिंगणार उतरवलं आहे. त्यात ठाकरे गटाकडून या मतदारसंघात पुन्हा अजय चौधरींना संधी दिली आहे. आता महायुतीकडून या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाते हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे शिवडी मतदारसंघात यंदा तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 - Uddhav Thackeray group displeased in Shivdi Constituency, Sudhir Salvi supporters upset after Ajay Chaudhary was nominated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.