Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जागावाटपाबाबत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बैठकांचे सत्र सुरू आहेत.तर दुसरीकडे ठाकरे गटाचा वांद्रे पूर्व मतदारसंघातील उमेदवार ठरला आहे. झिशान सिद्दिकी यांच्याविरोधात ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई निवडणूक लढणार आहेत. याबाबत काल ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी एका मेळाव्यात घोषणा केली.
मुंबईतील 'या' ३ जागा वगळता ३३ जागांवर एकमत; तिढा सोडवण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक
काल ठाकरे गटाने मुंबईत गट प्रमुखांचा मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी आमदार अनिल परब उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल परब म्हणाले, काही दिवसापूर्वी मी साहेबांना भेटलो. त्यानंतर आम्ही सगळेच पदाधिकारी उद्धव ठाकरेंना जाऊन भेटलो. उद्धव ठाकरेंनी वांद्र पूर्व विधानसभेचा उमेदवार म्हणून वरुण सरदेसाई यांचे नाव निश्चित केले आहे, असं अनिल परब यांनी जाहीर केले. यामुळे आता झिशान सिद्दिकी यांच्याविरोधात ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई निवडणूक लढवणार हे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
जागावाटपासाठी बैठका सुरू
दरम्यान, दोन दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागावाटपासाठी बैठकांचे सत्रव सुरू आहे. महाविकास आघाडीत आतापर्यंत २१६ जागांवर एकमत झालं आहे. तिढा असलेल्या जागांवर तोडगा काढण्यासाठी मविआ नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत. या बैठकीत संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, सतेज पाटील हे उपस्थित आहेत. मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला आज बैठक सुरू आहे. त्यात मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे.
काँग्रेस १५, ठाकरेसेना १८ आणि राष्ट्रवादी २ आणि समाजवादी पार्टीला १ जागा देण्यावर सहमती झाली आहे. त्याशिवाय कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवर अद्याप पेच आहे. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर होऊ शकते असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. काँग्रेसची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी २० ऑक्टोबरला येणार आहे. ८४ जागांबाबत उमेदवारी निश्चित झाली असून २० तारखेला पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. त्याचदिवशी उमेदवारांची यादी जाहीर केली जाऊ शकते.