Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 06:11 AM2024-11-22T06:11:46+5:302024-11-22T06:13:01+5:30
शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिंदेसेनेला केवळ एक जागा राखता आली.
सुरेश ठमके, मुंबई
Maharashtra Assembly Election 2024: मुंबई महानगरपालिकेची सत्ता असो, अथवा मुंबईतील आमदारांचे संख्याबळ असो, मुंबई नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिली. मात्र, शिवसेनेतील फुटीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाढलेले साडेचार टक्के मतदान हे आपल्याच पक्षाच्या बाजूने असल्याचा दावा, शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे आता मुंबईकर मतदाराने शिवसेनेच्या कोणत्या गटाला पसंती दिली आहे, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिंदेसेनेला केवळ एक जागा राखता आली. उद्धवसेनेला मात्र मुंबई शहरातील तीन जागा जिंकता आल्या. विधानसभा निवडणुकीत मुंबई शहर आणि उपनगरात मिळून उद्धवसेनेने २२, तर शिंदेसेनेने १४ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
मुंबई आणि उपनगरात मत टक्का वाढला आहे. लोकसभा निवडणुकीपेक्षा या मतदानात दीड टक्क्याने वाढ झाली आहे.
शंभर टक्के शिंदेसेना, महायुतीला फायदा
मुंबई आणि महाराष्ट्रात सर्वत्र लाडकी बहीण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला. मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीत त्याचेच प्रतिबिंब आहे. याशिवाय संजय राऊत आणि मंडळींनी मुंबईत नऊ लाख बोगस मतदार एका विशिष्ट समाजाचे नोंदवले, असे सर्वेक्षण टीसने जाहीर केले आहे. केवळ हिंदुत्व आणि महायुतीला विरोध म्हणून अशा प्रकारचे षडयंत्र रचले गेले. ही बाब मुंबईतील जनतेला रुचली नाही. त्यामुळे या विरोधात मुंबईतील जनतेने बाहेर पडून आपला राग व्यक्त केला आहे. यामुळे मुंबई कोणाची हे पुन्हा एकदा स्पष्ट होईल. - अरुण सावंत, प्रवक्ते, शिंदेसेना
वाढीव मतदानामुळे जनतेचा रोष उघड
मुंबईत मतदानाचा वाढलेला टक्का हा महिलांचा आहे. महायुतीने हा लाडकी बहीण योजनेचा परिणाम म्हटले असले तरी महाविकास आघाडीने आम्ही मांडलेल्या महालक्ष्मी योजनेला मिळालेला हा प्रतिसाद आहे किंवा भडकलेल्या महागाईचा प्रातिनिधिक विरोध आहे. जेव्हा मतदान मोठ्या प्रमाणावर होते, तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला असंतोष जनता मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करीत असते. यावेळी सुद्धा जनतेच्या रोषाला सत्ताधाऱ्यांना सामोरे जावे लागणार आहे आणि मुंबईत नेहमीच मतदार शिवसेनेच्या बाजूने राहिला आहे. त्यामुळे यावेळी सुद्धा आमच्या जागा निश्चितच जास्त येतील. -सचिन अहिर, आमदार, उद्धवसेना
आम्हालाही उत्सुकता
मुंबईतील वाढलेल्या मतदानाचा टक्का हा मतदारांच्या जागृतीचा आणि कर्तव्याचा भाग आहे. मतदारांनी उत्स्फूर्त केलेले मतदान उद्धवसेनेच्या पथ्यावर पडते की शिंदेसेनेच्या? याबाबत आम्हालाही उत्सुकता आहे. -भगवंत पालांडे, जागरूक मतदार