Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 08:17 PM2024-10-27T20:17:54+5:302024-10-27T20:19:37+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण यावरुन चर्चा सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला आणि महायुतीचा पुढच्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले.
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
आज एनडी टीव्ही मराठी या वृत्तवाहिनीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले. यावेळी मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना महायुतीचा पुढचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?, असा प्रश्न केला, यावर बोलताना फडणवीस म्हणाले, पुढचा मुख्यमंत्री कोण आहे हे निवडणुकीनंतर सांगितले जाते. निवडणुकीच्या आधी सांगितले जात नाही. आमच्या महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत, एकनाथ शिंदे त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. अजित पवार त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. यामुळे हे दोन अध्यक्ष आणि आमच्या पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड हे बसून मुख्यमंत्री कोण असणार हे ठरवतील, असंही फडणवीस म्हणाले.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. फडणवीस म्हणाले, आम्हाला मुख्यमंत्रिपदाची चिंता नाही कारण एक मुख्यमंत्री आम्हाला सध्या लीड करत आहेत . त्यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणुका लढवत आहे, पण प्रश्न असा आहे की, महाविकास आघाडीला विचारलं पाहिजे की कुणाला मुख्यमंत्री तुम्ही बनवणार आहात, आताच मुख्यमंत्रिपदाच नाव जाहीर न करता एकमेकांविरोधात बोलत आहेत. नाव जाहीर केल्यानंतर काय करतील सांगता येत नाही, असा खोचक टोलाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला.
"युतीच्या राजकारणामुळे चांगले लोक दूर गेले"
"महाराष्ट्राची निवडणूक अशी आहे की, याठिकाणी सहा पक्ष प्रमुख आहेत आणि इतके पक्ष आहेत की, प्रत्येक कलाकाराला रोल आहे. इतके सिनेमे बननं चाललेलं आहे. त्यामुळे प्रत्येक जण जो स्वतःला हिरो समजतो. तो ज्या सिनेमात काम मिळेल तिथे चाललाय. मी नावं घेणार नाही, पण काही लोकांच्याबद्दल मला दुःखही आहे. कारण चांगली मंडळी आहेत, जी या युतीच्या राजकारणामुळे आमच्यापासून दूर गेली. त्याचं दुःख आहे."