Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेस-ठाकरे गटातील वाद मिटणार? प्रभारी रमेश चेन्नीथला ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 12:44 PM2024-10-19T12:44:05+5:302024-10-19T12:45:40+5:30
काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत.
Maha Vikas Aghadi Seat Sharing conflict: महाविकास आघाडीत काही जागांवरून रस्खीखेच सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला विदर्भात काही जागा हव्या आहेत. पण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्या सोडायला तयार नसल्याचे सांगितले जाते. याबद्दलची नाराजी खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. त्यानंतर पटोलेंनी राऊतांना उपरोधिक भाषेत सुनावले, यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जागावाटपासाठी वाद सुरू असल्याची चर्चा सुरू आहे, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत.
एकमेकांची वाट पाहण्यात सगळ्यांच्या उमेदवार याद्या लांबल्या; ही दोन कारणंही महत्वाची
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला हे सकाळी ११ वाजता मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. नाना पटोले आणि ठाकरे गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत आहे. विदर्भातील जागावाटपावरुन नाना पटोले आणि ठाकरे गटात काही दिवसापासून वाद सुरू असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. काल महाविकास आघाडीची जागावाटपासाठी बैठक झाली, या बैठकीत विदर्भातील जागेवरुन नाना पटोले आणि ठाकरे गटात वाद झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. दरम्यान, आता या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
मेरीटनुसार आम्ही जागा लढणार असं नाना पटोले यांनी सांगितलं होतं. यानंतर या जागेवरुन पटोल आणि ठाकरे गटात वाद सुरू झाला. आज सकाळीच खासदार संजय राऊत यांनी या बैठकीची माहिती दिली होती. यावेळी राऊत यांनी राष्ट्रवादी आणि ठाकरे गटातील जागावाटप संपले असल्याचे सांगितले होते.
मला कुणीही अडवू शकत नाही-नाना पटोले
पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्याबद्दल भूमिका मांडत असताना अनिल देसाई, जितेंद्र आव्हाडांनी अडवण्याचा प्रयत्न केला, असे नाना पटोलेंना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, "मी माझी भूमिका मांडली. त्यामुळे मला कुणीही अडवू शकत नाही. तुमचा गैरसमज होत असेल. माझी जी काही भूमिका आहे, ती माझ्या पक्षाच्या हिताने मांडणार, महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी मांडणार. त्यामुळे माध्यमांनी आम्हाला सहकार्य करावं आणि आमच्यात कुठलेही भांडण नाही, एवढंच आमचं म्हणणं आहे", असे नाना पटोले म्हणाले.