महाराष्ट्र निवडणूक निकालः अभिजीत बिचुकलेंना पहिल्या फेरीत शून्य मतं; दुसऱ्या फेरीत उघडलं खातं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 09:02 AM2019-10-24T09:02:34+5:302019-10-24T09:03:06+5:30
Maharashtra Election Result 2019 आदित्य ठाकरेंकडे मोठी आघाडी
मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानं सर्वांचं लक्ष वरळीकडे लागलं आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेवरळीतून निवडणूक लढणार आहेत. त्यांचा विजय निश्चित समजला जात आहे. मात्र ते किती मतांनी जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.
पहिल्या फेरीअखेर आदित्य ठाकरे सात हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात रिंगणात उतरुन अभिजीत बिचुकले यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. मात्र पहिल्या फेरीनंतर त्यांना भोपळाही फोडता आला नाही. पहिल्या फेरीअखेर त्यांना एकही मत मिळालं नाही. मात्र दुसऱ्या फेरीत त्यांना 48 मतं मिळाली आहेत. बिग बॉसमुळे अभिजीत बिचुकले चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवारी अर्ज भरला होता. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री आपण ठरवू, असं बिचुकलेंनी अर्ज भरताना म्हटलं होतं.
वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात राष्ट्रवादीनं सुरेश माने यांना उमेदवारी दिली. मात्र मनसेनं उमेदवार दिलेला नाही. आदित्य ठाकरेंना शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पुढे आणलं आहे. तर भाजपानं आदित्य यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याचे संकेत दिले आहेत. आदित्य यांच्या रुपात ठाकरे घराण्यातली पहिलीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.