महाराष्ट्र निवडणूक निकालः परळीत भावानेच मारली बाजी, विजयानंतर धनंजय मुंडेंची 'ही' पहिला प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 01:46 PM2019-10-24T13:46:02+5:302019-10-24T13:49:42+5:30
राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या परळी मतदारसंघात पहिल्या तीन फेऱ्यांमधील निकालानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला आहे.
परळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडेंचा विजय झाला आहे. धनंजय मुंडेंनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना सत्याचा विजय झाल्याचे म्हटले आहे. राज्यातील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघात अखेर भावाने बाजी मारली आहे. पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. आपल्या पराभवानंतर पंकजा यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना, अनाकलनीय असे म्हटले आहे.
राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील हाय व्होल्टेज लढत ठरलेल्या परळी मतदारसंघात पहिल्या तीन फेऱ्यांमधील निकालानंतर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंना मोठा धक्का बसला आहे. धनंजय मुंडेंनी परळी मतदारसंघातून विजय मिळवला असून धनंजय मुंडेंनी सुरुवातीपासूनच मतांची आघाडी घेतली होती. तर पंकजा यांची पिछेहट झाल्याचे पाहायला मिळाले. येथील शक्तीकुंज वसाहतीमधील क्लब बिल्डींगमध्ये परळी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.
निवडणूक प्रचारातील आरोप प्रत्यारोपामुळे परळी मतदारसंघातील लढत राज्यात चर्चेचा विषय बनली होती. धनंजय मुंडेंच्या व्हायरल क्लिपनंतर पंकजा यांना आलेली भोवळ आणि त्यानंतर बदललेलं राजकीय वातावरण परिणामकारक ठरेल, असे सांगण्यात येत होते. या निवडणुकीत धनंजय मुंडेनी बाजी मारली असून पंकजा यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. धनंजय मुंडेंनी विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना, सत्यमेव जयते असे आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन लिहिले आहे.
21 ऑक्टोबर रोजी या मतदार संघात एकुण 73 टक्के मतदान झाले. एकूण 3 लाख 6 हजार 204 मतदारांपैकी 2 लाख 23 हजार 300 मतदारांनी हक्क बजावला. यात 1 लाख 11 हजार 541 पुरुष तर 1 लाख 3 हजार 769 स्त्री मतदारांनी मतदान केले. एकुण 335 मतदान केंद्रावर हे मतदान झाले.
सत्यमेव जयते!
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 24, 2019