मुंबई - लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर मोठ्या प्रमाणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून पक्षांतर झाले. अनेक दिग्गज नेते भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष गलीगात्र झाला होता. विधानसभा आणि सातारा पोटनिवडणुकीचा निकाल राष्ट्रवादीला आनंद देणार आहे. राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी विजयापेक्षा पराभवाचा आनंद अधिक असल्याचं म्हटलं आहे.
निवडणुकीचा निकाल लागला असून आघाडीला सत्तेपर्यंत पोहोचणे पुन्हा एकदा शक्य झाले नाही. मात्र, साताऱ्यातील विजय आघाडीला राज्यात झालेला पराभव विसरायला लावणार ठरला आहे. त्याच पार्श्वभूमीवर कळवा मुब्रा विधानसभेतील विजयी उमेदवार आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी साताऱ्यातील भाजपाचे उमेदवार उदयनराजेंना टोला लगावला आहे. माझा विजय झाल्यामुळे माझी जबाबदारी वाढली आहे. प्रचाराची टीका-टीपण्णी प्रचारानंतर संपते, विजयानंतर तर ती संपते, असेही आव्हाड म्हणाले.
लावून जितेंद्रचा गुलाल कपाळी, घरी निघाली दिपाली, असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेच्या उमेदवार दिपाली सय्यद यांच्या पराभवावर टीपण्णी केली. पहिला विजय 17 हजार, दुसरा विजय 50 हजार आणि तिसरा विजय 76 हजारांचा आहे. लोकांनी उदयनराजेंना जो धडा शिकवला, माझ्या विजयापेक्षा मला उदयनराजेंच्या पराभवाचाच अधिक आनंद असल्याचे आव्हाड यांनी म्हटलंय. उदयनराजेंनी शरद पवारांच्या पाठीत जो खंजीर खुपसलाय, त्यांना लोकांनी धडा शिकवलाय. महाराजांच्या विचारांवर आम्ही चालतो, महाराजांनी आम्हाला गद्दारी शिकवलीच नव्हती. शरद पवारांनी अख्ख्या जिल्ह्याचा विरोध पत्करुन 2009 मध्ये उदयनराजेंना उमेदवारी दिली होती, याची आठवण जितेंद्र आव्हाड यांनी सांगितली.