मुंबईः भाजपाची अब की बार 220 पार ही घोषणा जनतेला पटली नाही. सत्ता जाते, सत्ता येते, मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. पक्षांतराला जनतेनं पाठिंबा दिलेला नाही, असं म्हणत शरद पवारांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांना जनतेनं पराभूत केले. साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. श्रीनिवास पाटील जनतेचं प्रश्न सोडवतील, असा विश्वास आहे. निवडणुकीच्या निमित्तानं मोदी-शहांनी महाराष्ट्र दर्शन केले. मोदी शहांच्या दौऱ्याचा राज्याच्या निकालावर कोणताही परिणाम झालेला नाही. नव्या समीकरणाबद्दल सर्व मित्रपक्षांशी चर्चा करूनच ठरवणार आहे, असं पवार म्हणाले आहेत. याबाबत बोलताना शरद पवार पुढे म्हणाले की, महायुतीचं २२० पार जे सुरू होतं ते लोकांनी स्वीकारलं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्यावेळी पेक्षा जास्त जागा जिंकल्या, विरोधी पक्षांनी एकजुटीने काम केलं. सत्तेचा उन्माद लोकांना आवडलं नाही, प्रचारात किती टोकाची मते मांडावी याबद्दलची सीमा पार केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली असं पवारांनी सांगितले. तसेच पक्षांतर करणाऱ्यांपैकी काही अपवाद सोडले तर पक्षांतर करणाऱ्यांना लोकांनी स्वीकारलं नाही. ज्यांनी पक्षांतर केली अशा लोकांबद्दल जनतेने नकारात्मक भूमिका घेतली. साताराकरांचे विशेष आभार मानतो, साताराला जाऊन श्रीनिवास पाटील आणि तेथील जनतेचे आभार मानणार आहे. सातारच्या गादीबद्दल सर्वांना आदर आहे. गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव झाला असा टोला शरद पवारांनी उदयनराजेंना लगावला आहे.
महाराष्ट्र निवडणूक निकाल: 'सत्ता जाते, सत्ता येते, मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 2:27 PM