मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या झंझावाती दौऱ्याचा परिणाम निकालावर दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत गतवर्षीच्या तुलनेत चांगल यश मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे 50 उमेदवार आघाडीवर आहेत. विधानसभा निवडणुकांच्या निकालात काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी सरस ठरत असून भाजपाच सर्वात मोठा पक्ष ठरत असल्याचे निकालावरुन दिसून येत आहे. मात्र, शरद पवारांचा झंझावत परिणामकारक ठरला, असेच म्हणता येईल.
सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला 41 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांनी निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला रामराम करून सेना-भाजपात प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांनी झंझावती दौरे करत तरुणाईचे मतपरिवर्तन केल्याचं दिसून आलं. पवारांच्या या दौऱ्याचा इम्पॅक्ट निकालात दिसून येत आहे. साताऱ्यातील शरद पवारांची सभा उदयनराजेंसाठी धक्कादायक निकाल देणारी ठरत आहे. राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे नेते उदयनराजे भोसले जवळपास 35 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. त्यामुळे, पवारांची पावसातील सभा निर्णायक ठरणार आहे, असेच चित्र निकालातून दिसून येतंय.
शरद पवारांनी राष्ट्रवादीचा गड बऱ्याचअंशी एकट्यानेच लढवला, जिकडे जाईल तिकडे पवारांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळत होता. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या नेत्याने गद्दारी करुन सेना-भाजपाला जवळ केलं. त्या मतदारसंघात पवारांनी सभा घेतल्या. विधानसभा निवडणुकांच्या प्रचारकाळात पवारांनी 50 पेक्षा अधिक सभा घेतल्या आहेत. त्याचाच परिणाम यंदाच्या निवडणुकीत दिसून येत आहे. पवारांच्या राष्ट्रवादीला 50 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता असून आघाडी मिळविण्यात राष्ट्रवादीने अर्धशतक गाठले आहे.