"हा नियतीचा खेळ! ज्यांच्या मागे ED लावली त्यांनाच केंद्राची सुरक्षा दिली"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 01:25 PM2022-07-04T13:25:08+5:302022-07-04T13:27:16+5:30
मविआ सरकारच्या पहिल्या दिवसापासून सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरू होता असा आरोप भास्कर जाधव यांनी भाजपावर केला.
मुंबई - गेल्या ८ दिवसांत मी खूप अस्वस्थ, विचलित झालोय. एकनाथ शिंदे हे आजही सभागृहात सांगतात मी शिवसेनेचा आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आनंद दिघेंचा वारसदार आहे. तुमच्यावर आता खूप जबाबदारी आलीय. तुमची आणि माझी फारशी उठबस झाली नाही. तुम्ही कधी माझ्याशी बोलत नव्हता. एकनाथ शिंदे गटनेते झाले. सत्कार करण्यासाठी एकदा आलो. माझी आणि तुमची भेट २ वेळाच झाली आहे. पण आपण करत असलेली जनसेवा, कोकणात महापूर जी कृती केली तो खऱ्या अर्थाने आनंद दिघेंचा वारसदार असल्याची साक्ष दिली अशी कबुली शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेत दिली.
भास्कर जाधव म्हणाले की, एकाबाजूला ४० शिलेदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे आहेत. तर दुसऱ्याबाजूला शिवसेनेचा सामान्य शिवसैनिक छातीचा कोट करून तुमच्याविरोधात लढायला उभा राहिलाय. लढाई लढण्यासाठी ज्याला थांबायचं कळतं तो खरा नेता. या महाराष्ट्रात पुन्हा महाभारत, रामायणाची पुनरावृत्ती होणार आहे. पानीपतच्या युद्धात एकमेकांच्याविरोधात लढतायेत. दिल्लीच्या तख्तासाठी मराठी एकमेकांविरोधात लढत आहेत असं सांगितले.
तसेच मविआ सरकारच्या पहिल्या दिवसापासून सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. नियती कुणालाही सोडत नाही. ज्यांच्यामागे ईडी लावली त्यांच्याच घराखाली केंद्र सरकारचे पहारे देऊन संरक्षण द्यावे लागतेय. माझे बोलणं ऐकून घेतलं जाणार नाही हे माहिती आहे कारण वर्मावर घाव पडतोय. राष्ट्रवादीसोबत ८० तास सत्ता केली तेव्हा हिंदुत्व कुठे गेले? मराठी माणसांवर ईडी लावली जाते. संजय राऊत, अविनाश भोसले, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव यांच्यासह सगळ्या मराठी माणसांवर ईडी लावली. एकवेळ पक्षाने घरी बसवलं असतं तरी चालले असते परंतु अशी विटंबना नको अशी भावना देवेंद्र फडणवीसांना व्यक्त करायची होती असा टोला भास्कर जाधव यांनी सभागृहात लगावला.
दरम्यान, एकनाथ शिंदे तुम्हाला हे लढवतायेत, शिवसेनाविरुद्ध शिवसेना लढवतं आहे. रक्त शिवसैनिकांचे सांडेल. तुमच्यावर काहीही प्रेम नाही. शिवसेना कशी वाचवायची यासाठी तुम्हाला दोन पाऊलं मागे यावे लागेल. भाजपाचा इतिहास पाहिला तर एकनाथ शिंदे यांनी ही गोष्ट समजून घ्यायला हवी. जर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा विचार केला तर महाराष्ट्राची जनता त्यांना डोक्यावर घेईल असं आवाहन भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केले.