Join us

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचं बारसं; जाणून घ्या अधिकृत नाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 7:58 PM

शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला नाव देण्यात आले.

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अवघ्या साडेतीन दिवसाचे 'देवेंद्र सरकार-2' आज कोसळल्यानंतर आता राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या आघाडीचे सरकार येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह घटक पक्षांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. 

या बैठकीत शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला नाव देण्यात आले. यावेळी 'महाराष्ट्र विकास आघाडी' म्हणून आघाडी स्थापन करण्याचा ठराव शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी मांडला. या ठरावाला आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. त्यामुळे आता या आघाडीचे नाव 'महाराष्ट्र विकास आघाडी' असे ठेवण्यात आले आहे.

याचबरोबर, या 'महाराष्ट्र विकास आघाडी'चे नेतृत्व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी करावे असा ठराव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या आदेशाने हे नावे सूचित करण्यात आले. त्यामुळे आता नव्या 'महाराष्ट्र विकास आघाडी'चा गटनेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय, या बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. शेतकरी, महिला, प्रादेशिक प्रश्न अशा विविध मुद्द्यावर ही 'महाराष्ट्र विकास आघाडी' काम करेल असे ठरविण्यात आले आहे. 

दुसरीकडे, या नव्या 'महाराष्ट्र विकास आघाडी'च्या सरकारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ उद्धव ठाकरे येत्या 1 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा होणार असल्याचे सांगत आहे.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्रमहाराष्ट्र सरकार