Join us

Raj Thackeray: मनसेला मुंबईत यंदा नवनिर्माणाची संधी? काय सांगतं राजकीय गणित?

By मोरेश्वर येरम | Published: October 17, 2024 5:13 PM

MNS Raj Thackeray: गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत मनसेने २५ उमेदवार दिले होते. त्यातील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. 

विधानसभेच्या महासंग्रामाचा शंखनाद अखेर झाला आणि सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक अभूतपूर्व ठरणार आहे. कारण युती-आघाड्यांची भाकरी यंदा पूर्णपणे फिरली आहे. जे कधी एकत्र येतील असं वाटलं नव्हतं असे राजकीय पक्ष एकत्र आलेत. त्यामुळे विधानसभा मतदार संघातील मतांची गणितं बदलली आहेत. सध्याची परिस्थिती अशी आहे की जिथे ठाकरे गटाचा उमेदवार असेल तिथे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ठाकरे गटासाठी काम करावे लागणार आहे. तर भाजपा आणि शिंदे गटाचा उमेदवार असेल तिथे अजित पवारांच्या केडरला काम करावे लागेल. त्यामुळे वोट ट्रान्सफरचा मुद्दा अत्यंत कळीचा ठरणार आहे. आता मतदारांचा होणारा संभ्रम मनसेच्या फायद्याचा ठरू शकतो असेही बोलले जात आहे. त्यात मुंबईतील काही जागांवर मनसेला आश्वासक चित्र दिसत आहे. 

मुंबईतील शहर आणि उपनगर या दोन जिल्ह्यांत एकूण ३६ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप आणि शिवसेना महायुतीचे ३० आमदार निवडून आले होते. तर काँग्रेसचे ४, राष्ट्रवादी १ आणि सपाचे १ आमदार निवडून आले होते. मात्र, राजकीय समीकरण बदललं आणि शिवसेनेचे उद्धवसेना आणि शिंदेसेना, असे दोन पक्ष निर्माण झाले. त्यामुळे मुंबईत आता भाजपचे १६, उद्धवसेनेचे ८, शिंदेसेनेचे ६, काँग्रेसचे ४, राष्ट्रवादी (अजित पवार गट) १ आणि समाजवादी पक्ष १ असे आमदार आहेत. 

सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन खलबतं सुरू आहेत. आता या रस्सीखेचमध्ये कोणती जागा कुणाला सुटते हे महत्वाचे असेल. पण या सगळ्यात स्थानिक पातळीवर नाराजीनाट्य रंगणार हे नक्की. तर दुसऱ्या बाजूला मनसेने 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे. त्यामुळे मतदारांना युती-आघाडीच्या राजकारणात वेगळा पर्याय म्हणून मनसे स्वत:ला प्रोजेक्ट करत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत मनसेने २५ उमेदवार दिले होते. त्यातील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मनसेच्या उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. 

माहिममध्ये सदा सरवणकर विजयी उमेदवार ठरले होते. जे आता शिंदे गटात आहेत. त्यामुळे इथे यंदा मविआचा उमेदवार असेल. शिवसेनेच्या मतांचे विभाजन होईल. दुसऱ्या क्रमांकाची मते मनसेच्या संदीप देशपांडे यांनी होती. देशपांडे यांना ४२,६९० मते होती. शिवडीतही मनसेचे संतोष नलावडे ३८,३५० मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. यावेळी राज यांचे खंदे समर्थक आणि शिवडीतून याआधी आमदारकी भूषवलेले बाळा नांदगावकर यांच्या नावाची घोषणा याआधीच करण्यात आली आहे. त्यामुळे याही जागेवर मनसेला चांगली संधी आहे असे म्हणता येईल. तिसरी जागा आहे भांडूप पश्चिम. याठिकाणी मनसेच्या मतदारांचे चांगले केडर आहे. मनसेचे संदीप जळगावकर ४२ हजार ७८२ मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. तर शिवसेनेचे रमेश कोरगावकर विजयी झाले होते. ते आता ठाकरेंसोबत आहेत. त्यांना ७१ हजार ९५५ मते मिळाली होती. त्यात भाजपाची साथ होती. याच मतदार संघात २०१४ साली सेना-भाजप वेगवेगळी लढली होती आणि भाजपा उमेदवाराला ४३,३७९ मते होती. त्यामुळे भाजपाचीही चांगली मतं याभागात आहेत. त्यामुळे ठाकरे गटाची याठिकाणी धाकधूक वाढू शकते. याचा फायदा दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराला म्हणजेच मनसेला होऊ शकतो असे म्हणता येईल. मागाठाणे मतदार संघातही मनसेच्या नयन कदम यांना ४१ हजार ६० मतं होती आणि ते दुसऱ्या क्रमांकावर होते. तर शिवसेनेचे प्रकाश सुर्वे विजयी उमेदवार ठरले होते. ते आता शिंदेंसोबत आहेत. याजागेवर मविआ कोणता उमेदवार देणार हे पाहणे महत्वाचे असेल. मनसेची मतं इथं ठरलेली आहेत जी ज्यांना कधी धक्का लागत नाही. पण ती इतर उमेदवारांवर भारी पडणार का हे पाहावे लागेल. पाचवा मतदार संघ जिथे मनसेचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता तो म्हणजे मुलुंड विधानसभा मतदारसंघ. याठिकाणी हर्षला चव्हाण २९ हजार मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होत्या. त्यामुळे इथेही जवळपास ३०-३५ हजार मते मनसेच्या खात्यात आहेत. त्यात वाढ करण्यावर मनसेला भर द्यावा लागेल. घाटकोपर पूर्वमध्ये मनसेचे सतीश पवार १९,७३५ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर होते. पण पहिल्या क्रमांकावर भाजपाच्या पराग शाह यांनी एकहाती तब्बल ७३ हजार ५४ मते मिळवली होती. याशिवाय ३६ पैकी केवळ २५ मतदार संघात गेल्या निवडणुकीत मनसेने उमेदवार दिले होते. यावेळी वरळी, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, विक्रोळी याही मतदार संघांमध्ये चाचपणी सुरू असल्याचे कळते. 

राज ठाकरे यांची भाषणं, जाहीर सभा हिच पक्षाची खरी ताकद आहे. त्यात मराठी मतदारांमध्ये आजही मनसेबाबत सॉफ्ट कॉर्नर पाहायला मिळतो. आता जसजसा प्रचाराचा रंग चढेल त्यात मनसे आपले रंग भरण्यात यशस्वी होईल का? आणि यंदा तरी ‘मनसे’चे इंजिन मुंबईत धावेल का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

टॅग्स :राज ठाकरेमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मनसेमुंबई