मुंबई : ऊर्जामंत्री या नात्याने वीजहानी कमी करण्याच्या कामास मी प्राधान्य देणार असल्याचे म्हणत महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार असल्याची घोषणाच नव्या सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी बुधवारी केली.नितीन राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, राज्यात विजेचे असमान वितरण आहे; ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. युवांसाठी रोजगार निर्मिती करण्यावर आमचा अधिकाधिक भर असणार आहे. दोन वर्षांत कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प विस्तारित करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. या माध्यमातून अधिक रोजगार मिळेल. दरम्यान, मंगळवारीदेखील नितीन राऊत यांनी फोर्ट येथील महावितरणच्या सांघिक कार्यालयात आज महावितरण, महानिर्मिती, महापारेषण आणि ऊर्जा विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.वीज वितरण हानी कमी करण्यासाठी उपाययोजना करून ऊर्जा विभागात नावीन्यपूर्ण योजना आणाव्यात. सर्व योजनांमध्ये सुसंगतता आणावी. ग्राहकांना तत्पर सेवा मिळावी याकरिता आॅनलाइन प्रणालीचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा. ग्राहकांचा विजेवरील होणारा खर्च कमी करण्यासाठी वीजनिर्मितीचा खर्च कमी करण्यात यावा. वीजनिर्मितीमध्ये कार्यक्षमता वाढवावी. सौर कृषिपंपाबाबत सुरू असलेल्या वेगवेगळ्या योजना एकत्रितपणे राबविण्यात याव्यात, अशा सूचना राऊत यांनी बैठकीत केल्या होत्या.दरम्यान, या बैठकीला महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी महावितरणच्या कामकाजाची माहिती दिली. महानिर्मितीचे संचालक (संचालन) चंद्रकांत थोटवे यांनी महानिर्मिती, तर संचालक (प्रकल्प) रवींद्र्र चव्हाण यांनी महापारेषणच्या कामकाजाची माहिती दिली. मेडाचे महासंचालक कांतीलाल उमप यांनी मेडातर्फे राबविण्यात येत असलेल्या कार्याविषयी माहिती दिली.
महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार- नितीन राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2020 5:44 AM