मुंबई : महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे, सशक्त वर्तमान आहे आणि समृद्ध भविष्यकाळ आहे. उद्योग, शेती, अर्थ अशा विविध क्षेत्रांतील शक्ती असलेल्या महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनवण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सोडला.
मुंबई महापालिका राबवत असलेल्या गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पातील जुळे बोगदे, एमएमआरडीएच्या ठाणे-बोरीवली ट्वीन टनेलचे भूमिपूजन, वांद्रे-संकुलातील (बीकेसी) इंडियन न्यूजपेपर सोसायटी टॉवरचे उद्घाटन आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. गोरेगाव नेस्को प्रदर्शन केंद्रात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि दीपक केसरकर उपस्थित होते.
मोदी यांनी मराठीतून भाषणास सुरुवात केली. पंतप्रधान मोदींचा भर विरोधकांवर टीका करण्याऐवजी विकासकामांवर होता. गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारने केलेली विकासकामे, भविष्यातील प्रकल्प आणि राज्यातील महायुती सरकार राबवत असलेल्या योजनांचा आढावा त्यांनी घेतला.
देशाच्या विकासात महाराष्ट्राची मोठी भूमिका
महाराष्ट्रात पर्यटन मोठ्या प्रमाणावर आहे. साहसाला वाव देणारे गड-किल्ले आहेत. समृद्ध सागर किनारे आहेत. मेडिकल टुरिझम आहे. महाराष्ट्र विकासाची गाथा लिहीत आहे. २१व्या शतकाला विकासाची आस आहे. देशाला वेगाने विकास हवा आहे. येत्या २५ वर्षांत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यात महाराष्ट्राची भूमिका मोठी असेल, असे पंतप्रधान म्हणाले.
नरेंद्र मोदींचा हात लागतो त्या कामाचे सोने होते : मुख्यमंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळे पायाभूत सुविधांची कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या हाताला परिसस्पर्श आहे, त्यांचा हात लागतो त्या कामाचे सोने होते, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
मोदींच्या विरोधात सगळे विरोधक एकवटले होते. विरोधकांनी अपप्रचार केला, परंतु झूट की उमर कम होती है, असा टोला त्यांनी लगावला.
मोदींचे नाव इतिहासात नोंदले जाईल : देवेंद्र फडणवीस
गरीब कल्याणाबरोबरच पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केलेल्या कामांबद्दल मोदी यांचे नाव इतिहासात नोंदले जाईल, अशी प्रशंसा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
यावेळी त्यांनी चारोळीही सादर केली. ‘आम्ही करू मेहनत, आम्ही करू कष्ट, पुन्हा विधानसभेत जिंकून दाखवू महाराष्ट्र’...अशी चारोळी करून ते रामदास आठवले यांच्या शेजारी बसले. दोघांमध्ये हास्य विनोद झाला.