राज्यातील ओबीसींचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा; मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रालाही न्याय मिळेल- छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 02:12 PM2022-05-18T14:12:20+5:302022-05-18T14:17:03+5:30

इंपिरकल डाटा जमा करून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण पूर्ववत होईल असा विश्वासही मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra will get justice just like Madhya Pradesh, Said That Minister Chhagan Bhujbal | राज्यातील ओबीसींचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा; मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रालाही न्याय मिळेल- छगन भुजबळ

राज्यातील ओबीसींचा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा; मध्यप्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रालाही न्याय मिळेल- छगन भुजबळ

googlenewsNext

मुंबई - आज सर्वोच्च न्यायालयाने मध्यप्रदेश राज्यसरकारला ओबीसी आरक्षणासहित निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे हा निर्णय स्वागतार्ह असून महाराष्ट्राला देखील मध्यप्रदेश प्रमाणेच न्याय मिळेल, असा विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
 
छगन भुजबळ म्हणाले की, मागच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील काही मंडळी कोर्टात गेली त्यावेळी सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टची पूर्तता करण्यास सांगितले आणि स्थानिक स्वराज संस्थेमधील ओबीसी आरक्षणावर गदा आली आणि हा निर्णय महाराष्ट्रासह सर्वच राज्यांना लागू झाला. यात महाराष्ट्र सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना करून एक डाटा सर्वोच्च न्यायालयाला दिला मात्र दुर्दैवाने तो फेटाळला गेला, असं भुजबळ म्हणाले.

राज्यसरकारने शांत न राहता पुन्हा एकदा समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना केली आहे आणि त्या माध्यमातून ओबीसींचा इंपिरकल डाटा जमा करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. तसेच मध्यप्रदेश सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा संपूर्ण देशातील ओबीसींसाठी फायद्याचा ठरणार आहे असेही छगन भुजबळ म्हणाले.

राज्यसरकारने माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना करून ओबीसींचा इंपिरकल डाटा जमा करण्याचे काम चालू केले आहे. काही दिवसांपूर्वीच आम्ही त्यांची भेट घेऊन लवकरात लवकर डाटा देण्याची मागणी केली. काल निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होऊ शकत नाही त्यामुळे या दरम्यान इंपिरकल डाटा जमा करून महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण पूर्ववत होईल असा विश्वासही मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.

राज्यसरकारने ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आणि ते सर्व प्रयत्न यशस्वी झाले आहेत यामध्ये प्रभाग रचना राज्यांकडे घेणे अथवा समर्पित ओबीसी आयोगाची स्थापना अशी सर्व पाऊले राज्यसरकारने यशस्वीपणे टाकली आहेत. त्यामुळे  येणाऱ्या निवडणुकीत ओबीसी घटकाला निश्चितपणे आरक्षण मिळेल असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Web Title: Maharashtra will get justice just like Madhya Pradesh, Said That Minister Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.