Join us

महाराष्ट्र होणार मोतीबिंदूमुक्त, सरकारी, खासगी डॉक्टरांची घेणार मदत

By अतुल कुलकर्णी | Published: November 21, 2017 6:03 AM

मुंबई : राज्यात मोतीबिंदू झालेले पाच ते सहा लाख रुग्ण असून, त्यांच्या डोळ्यांवर आॅपरेशन करण्यासाठी आता ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ योजना राबविण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यात मोतीबिंदू झालेले पाच ते सहा लाख रुग्ण असून, त्यांच्या डोळ्यांवर आॅपरेशन करण्यासाठी आता ‘मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र’ योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी सरकारी व खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि उपजिल्हा रुग्णालये या तीन पातळ्यांवर ही योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कल्पना मांडली असून, त्यासाठी राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागातील ६० नेत्रतज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे ३० डॉक्टर्स यांचा एकत्रित संच केला जाणार आहे. सरकारी इस्पितळातून काम करणाºया नेत्रतज्ज्ञांना आता एक वेगळा नेत्रविभाग करून जोडले जाणार आहेत. या कामासाठी मुख्य समन्वयक म्हणून विख्यात नेत्रतज्ज्ञ व सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्यावर जबाबदारी देण्यात आल्याचे डॉ. शिगनारे म्हणाले.वैद्यकीय शिक्षण विभागाकडे १६ आॅपरेशन थिएटर्स आहेत, तर सार्वजनिक आरोग्य विभागाकडे जवळपास ५५ आॅपरेशन थिएटर्स असले, तरीही त्यातील १५ बंद पडलेले आहेत आणि १० आॅपरेशन थिएटर्सचे एसी बंद आहेत. हे आॅपरेशन थिएटर्स सीएसआर फंडातून दुरुस्त करण्याची जबाबदारीही डॉ. लहाने यांच्यावर सोपविण्यात आल्याचे सांगून शिनगारे म्हणाले, यामुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडणार नाही, तसेच जेथे मोतीबिंदू आॅपरेशनचे कॅम्प होतील, तेथे खासगी डॉक्टर्सचीही मदत घेतली जाईल. मिशन म्हणून हे काम राज्यात केले जाणार असून, मोतीबिंदू असणारा एकही रुग्ण राज्यात राहू नये, सगळ्यांना आॅपरेशननंतर चांगलीदृष्टी मिळावी, हा हेतू ठेवून हा उपक्रम राबविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :मुंबई