Join us  

महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही; नागपूर अपघातावरून राऊतांचं देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 11:17 AM

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत, त्याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिली जाईल, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

Nagpur Accident ( Marathi News ) : नागपूरमध्ये झालेल्या हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याचे नाव आल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोपांना धार आली आहे. या घटनेवरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "अपघातग्रस्त गाडीमध्ये त्यातील तरुण जिथं गेले होते तेथील एका बारचं बिल मिळालं आहे. त्यामध्ये दारू, चिकन, मटन आणि बीफ कटलेटचंही बिल आहे. श्रावण आणि गणपतीत बीफ खाणारे हे लोक आपल्या सगळ्यांना हिंदुत्व शिकवत असतात. तुम्ही स्वत: बिफ खायचं आणि रस्त्यावर लोकांचं मॉब लिंचिंग करायचं. देवेंद्र फडणवीस तुम्हाला महाराष्ट्र माफ करणार नाही. तुम्ही चार वर्षांपूर्वीच्या एका जुन्या प्रकरणावरून अनिल देशमुख यांच्या अटकेची तयारी करताय आणि तुमच्याच पक्षाच्या एका नेत्याच्या मुलाने दारू पिऊन गाडी चालवत दहा गाड्या चिरडल्या आणि लोकांना मारण्याचा प्रयत्न केला, त्याला तुम्ही अभय देताय?" असा सवाल राऊत यांनी विचारला आहे.

नागपूर अपघातावरून सरकारवर टीका करताना राऊत पुढे म्हणाले की, "अशा प्रकारचा अपघात एखाद्या सामान्य माणसाने केला असता तर पोलिसांनी आतापर्यंत त्याला, त्याच्या कुटुंबीयांना, त्याच्या मित्रांना पकडून रस्त्यावर नेत त्याची धिंड काढली असती. मात्र सलमान खान सुटतो, एखाद्या बिल्डरचा मुलगा सुटतो, संकेत बावनकुळे सुटतो. कायदा सगळ्यांसाठी समान हवा. पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले आहेत, त्याची नोंद काळ्याकुट्ट अक्षरांत लिहिली जाईल. इतका घटिया गृहमंत्री या महाराष्ट्राला कधीच लाभला नव्हता," असा घणाघात राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, "नागपुरात गृहमंत्र्यांच्या नाकासमोर इतका भीषण अपघात झाला आहे, १७-१८ लोक रुग्णालयात दाखल आहेत, पण ज्या व्यक्तीच्या नावावर गाडी आहे, जो व्यक्ती आधी ड्रायव्हिंग सीटवर होता आणि नंतर तो बदलण्यात आला, त्याला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. तुम्ही कसल्या कायदा-सुव्यवस्थेच्या गोष्टी करत आहात?" असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. 

नेमकं काय घडलं?

रविवारी मध्यरात्री भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडी कारने  दोन कार व एका दुचाकीला धडक देत पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या कारमधील दोघेजण मद्यधुंद अवस्थेत होते हे पोलिसांनी कबुल केले आहे. तसंच या कारमध्ये बावनकुळेंचा मुलगा संकेतही होता, हे पोलिसांना मद्यधुंद तरुणांच्या चौकशीतून समजले आहे.  

रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार मार्गावर ऑडी कारने हा हिट अँड रनचा अपघात केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कारमध्ये तीनजण होते. यात बावनकुळेंचा मुलगाही होता. अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार हे दोघे मद्य प्राशन करून होते. या दोघांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. अर्जुन वाहन चालवत होता. या दोघांच्या चौकशीत अपघात झाला तेव्हा संकेतही होता व ड्रायव्हरच्या बाजुच्या सीटवर बसला होता, असे समोर आले आहे.  

टॅग्स :संजय राऊतदेवेंद्र फडणवीस