Join us

तुम्ही ठोकशाहीने राज्य करणार असाल तर आम्हीही..; राऊतांचा शिंदे-फडणवीस सरकारला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 11:26 AM

काल मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे, यावरुन आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

नागपुरात हिवाळी अधिवेशनाचा आज नववा दिवस आहे, शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात हे पहिलेच अधिवेशन आहे. विरोधी पक्षांनी सरकारला पहिल्या दिवशापासूनच धारेवर धरले आहे. तर दुसरीकडे काल मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहे, यावरुन आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. 

'गद्दारांची जगभरात पद्धत आहे ते कुठेही घुसतात. त्यांच सोडून द्या. मुंबई महापालिकेतील सर्व नगरसेवक एक आहेत. मुंबई महापालिकेत सर्व कार्यालयांना टाळे लावले आहे. देशात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही, देशात सध्या ठोकशाही सुरू आहे. शिवसेनेच्या कार्यालयात घुसखोर घुसतात, यानंतर त्या कार्यालयाला टाळे ठोकले जातात. जर तुम्ही ठोकशाहीने राज्य करणार असाल तर आम्हीही ठोकशाही सुरू करेन. मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालय फक्त शिवसेनेच्या ताब्यात राहिल. मुख्यमंत्री तुमच्या कार्यालयात एक दिवस भाजपवाले घुसतील, असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी लगावला. 

आपल्या कर्तृत्त्वाला सलाम पण; ठाकरेंच्या शिवसेनेचं एकनाथ शिंदेंना एकच चॅलेंज

शिंदे गटातील नरेश मस्के हे कधीकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तक्रारी घेऊन आमच्याकडे येत होते, आता काय झाले. आता कुठे गेल्या तक्रारी, असंही संजय राऊत म्हणाले. तुमच्याकडे जी सत्ता आहे फक्त ती सांभाळा, शिंदे गट घुसखोरच आहे. नोटीस न देताच महापालिकेने कार्यालय सील का केले, असा सवालही संजय राऊत यांनी केला. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्लिनचीट देणारे नेते आहेत, फडणवीस यांनी क्लिनचीटचा कारखाना उभा केला आहे. एका रात्रीत त्यांनी अनेकांना क्लिनचीट दिल्या आहेत. 

आज मुख्यमंत्री एकनााथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबागमध्ये जाऊन संघाच्या कार्यालयाला भेट दिली, यावरुन खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. 'संघ विचाराचा कीडा त्यांच्या कानात पहिल्यापासून आहे, पण हे चुकीच नाही. हिंदुत्ववादी विचारांची संघटना आहे. काही दिवसांनी ते काळी टोपी खाकी पँट घालून सभागृहात येतील त्यांचही आम्ही स्वागत करु. आरएसएसवर आम्ही कदीही टीका केली नाही. पण, आश्चर्य या गोष्टीच वाटत त्यांनी पक्षांतर केले ठीक आहे. रक्तांतर एवढ्या लवकर करतील असं वाटत नव्हत, असा टोलाही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाएकनाथ शिंदे