Join us

Maharashtra Winter Session 2022: धसका! मिंधे सरकार बिथरलेय, शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार?; शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 9:00 AM

Maharashtra Winter Session 2022: मिंधे सरकार अधिकच बिथरल्यासारखे वागू लागले असून, ते आता धसका सरकार झाले आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

Maharashtra Winter Session 2022: महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, नागपूर कथित भूखंड घोटाळा यांसारख्या मुद्द्यांवरून विरोधक महाविकास आघाडीने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच नागपूरला अधिवेशनासाठी गेले आहेत. यातच भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणानंतर सरकारने विधिमंडळात शाईच्या पेनावर बंदी घातल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेनेने शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. 

सामना अग्रलेखातून सरकारच्या या निर्णयाबाबत निशाणा साधण्यात आला आहे. नागपुरात सुरू झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सरकारला भलतीच हुडहुडी भरलेली दिसते. भाजप नेते व उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर मध्यंतरी पुण्यामध्ये जी शाईफेक झाली त्याचा मिंधे सरकारने भयंकर धसका घेतला व त्यातूनच आता विधिमंडळ आणि परिसरात शाईचे पेन आणण्यावर प्रतिबंध लादण्यात आले. शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा हा निर्णय हास्यास्पदच म्हणावा लागेल. लेखणीत वापरली जाणारी शाई म्हणजे जणुकाही एके-47 बंदुका किंवा आरडीएक्ससारखे विस्फोटक आहे, अशी भीती राज्यातील भाजप पुढारी व मिंधे सरकारच्या मनात घर करून बसली आहे, असे शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे. 

शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार?

चंद्रकांत पाटील यांच्यावर किंवा कुठल्याही नेत्यावर अशा प्रकारची शाईफेक होणे हे वाईटच. अशा घटनांचे समर्थन कदापि करता येणार नाही. मात्र शाईफेक करणे हे जसे चुकीचे आहे, तसेच विधिमंडळाच्या आवारात शाईचे पेन आणण्यावर बंदी घालणे हेदेखील चुकीचेच. आधी तोंडाला येईल ते बरळायचे, जनतेच्या मनातील श्रद्धास्थानांवर आघात करायचा, महापुरुषांची वाटेल तशी बदनामी करायची आणि नंतर धसका घेऊन शाईच्या पेनवर बंदी घालण्याचे भेदरट निर्णय घ्यायचे, यालाच राज्यकारभार म्हणावे काय? शाईवर किंवा पेनवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणारच नाही असा कारभार करायला काय हरकत आहे! बरे, विधिमंडळात शाईच्या पेनवर बंदी घातल्याने काय साध्य होणार आहे? सरकारला जनतेत मिसळावेच लागते. मंत्र्यांना, लोकप्रतिनिधींना जनतेत जाऊन संवाद करावाच लागतो. मग शाईच्या पेनवर अशी बंदी कुठे कुठे घालणार? अशी विचारणा शिवसेनेने सरकारला केली आहे. 

मिंधे सरकार अधिकच बिथरल्यासारखे वागू लागलेय

शाईबंदीचे उफराटे निर्णय घेण्यापेक्षा उफराटी विधाने करणाऱ्या पुढाऱ्यांच्या बेलगाम बोलण्यावर खरे तर बंदी घालायला हवी. महाराष्ट्रात वाचाळवीर मंत्री व सत्तापक्षाच्या नेत्यांनी तोंडाचा पट्टा सैल सोडून जो काही मैला गेल्या काही दिवसांत बाहेर फेकला, त्यामुळेच महाराष्ट्राचे वातावरण कलुषित व प्रदूषित झाले हे नाकारता येईल काय? हवाबाण सोडून सामाजिक वातावरण बिघडवण्यात खास करून भाजपचे पुढारी आघाडीवर आहेत व त्यातूनच राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्याचा दुर्दैवी प्रकार पुण्यात घडला. मात्र त्या घटनेपासून राज्यातील मिंधे सरकार अधिकच बिथरल्यासारखे वागू लागले आहे. महाराष्ट्रातील सरकार मिंधे तर आहेच; पण आता ते धसका सरकारही बनले आहे. शाईहल्ल्याच्या भीतीने विधिमंडळ आवारात शाईच्या पेनवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय भेदरटच म्हणावा लागेल. शाईवर बंदी घालण्यापेक्षा शाईफेक होणार नाही अशी आचरट विधाने मंत्री व सत्तापक्षाच्या नेत्यांनी टाळली तर असे बंदीचे घाबरट निर्णय घेण्याची वेळ धसका सरकारवर येणार नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशनउद्धव ठाकरेशिवसेनाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीस