Join us  

Maharashtra Assembly Winter Session: विधानसभेतील 'त्या' कृत्यावर भाजपा आक्रमक; देवेंद्र फडणवीस-भास्कर जाधव पुन्हा आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 2:17 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अंगविक्षेप करुन भाष्य करणं हे योग्य नाही असं म्हणत भाजपाने सभागृह स्थगित करुन तात्काळ या प्रकरणाची तपास करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

मुंबई – शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभेच्या सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल करत त्यांच्यावर टीका केल्यानं विरोधी पक्ष भाजपा आक्रमक झाली. मुख्यमंत्र्यांवर टीका केली तर तो महाराष्ट्राचा अपमान होतो मग देशाच्या पंतप्रधानांबाबत अशाप्रकारे नक्कल करत टीका करणं देशाचा अपमान होत नाही का? असा सवाल करत भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी आमदारांवर तोंडसुख घेतले. मात्र मी पंतप्रधानांची नक्कल केली नाही असा दावा भास्कर जाधव यांनी केला आहे.

याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नक्कल या सभागृहात केली जात असेल तर हे खपवून घेतले जाणार नाही. पंतप्रधान हे देशाचे आहेत. विधानसभेच्या सभागृहात अशाप्रकारे अंगविक्षिप्त करत असतील तर आम्ही अजिबात सहन करणार नाही. भास्कर जाधव यांनी माफी मागितली पाहिजे. कुठल्याही नेत्याची बदनामी या सभागृहात होता कामा नये. अध्यक्षांनी भास्कर जाधव यांना समज द्यावी आम्ही माफी मागायला सांगावी असं त्यांनी म्हटलं. यावेळी सभागृहात भाजपा आमदारांनी प्रचंड गदारोळ केला.

तर पंतप्रधान असो किंवा अन्य कुठल्याही नेत्याची नक्कल करणे योग्य नाही. भास्कर जाधव यांनी अशाप्रकारे कृत्य केले असेल तर ते आधी तपासून पाहावं. भास्कर जाधव यांच्या कृत्याचे समर्थन करणार नाही. परंतु अध्यक्षांनी रेकॉर्ड झालेला प्रकार तपासून पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील म्हणाले त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अंगविक्षेप करुन भाष्य करणं हे योग्य नाही असं म्हणत भाजपाने सभागृह स्थगित करुन तात्काळ या प्रकरणाची तपास करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह स्थगित करुन जे काही घडले त्याचा तपास करावा असं म्हटलं आहे. परंतु सभागृह स्थगित करण्यापेक्षा मी वापरलेले शब्द आणि अंगविक्षेप मागे घेतो असं भास्कर जाधवांनी म्हटलं. मात्र अंगविक्षेप मागे घेता येत नाही. भास्कर जाधवांनी स्वत: अंगविक्षेप केल्याचं मान्य केले आहेत. त्यामुळे भास्कर जाधवांनी माफी मागावी अशी मागणी भाजपाने केली. त्यावर कुठल्याही नेत्याचा अपमान होणार नाही अशी सूचना विधानसभा उपाध्यक्ष नाना झिरवळ यांनी सदस्यांना केली.

माफी मागण्यासाठी सभागृहात गोंधळ

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात माफी मागितली नाही तर या सभागृहाचा अवमान होईल. हा पक्षाचा विषय नाही. जर आज चूक झाली असेल तर त्यातून धडा घ्यायचा आहे. हा प्रकार आज थांबवला नाही तर उद्या पुन्हा अशा घटना घडतील. यूकेचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करतात. तर दुसरीकडे आपल्या सभागृहात असा अवमान केला जातो. त्यामुळे भास्कर जाधव यांनी माफी मागायला हवी असं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मात्र मी कुठलाही असंसदीय शब्द वापरला नाही. मी अंगविक्षेप आणि शब्द मागे घ्यावेत असं सांगितलं त्यापेक्षा मी काहीही करू शकत नाही असं भास्कर जाधवांनी सांगितले. मात्र माफी मागण्यावरुन गोंधळ न थांबल्याने अखेर विधानसभा सभागृह काही काळासाठी स्थगित करण्यात आले.

टॅग्स :विधानसभा हिवाळी अधिवेशनदेवेंद्र फडणवीसभास्कर जाधवनरेंद्र मोदी