महाराष्ट्रनगरचा ‘आदर्श’ वारसा

By Admin | Published: August 20, 2016 05:05 AM2016-08-20T05:05:30+5:302016-08-20T05:05:30+5:30

लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला अगदी त्याच उद्देशाने गेल्या ४८ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करीत महाराष्ट्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पारंपरिकतेचा वारसा जपला आहे.

Maharashtraanagar's 'ideal' legacy | महाराष्ट्रनगरचा ‘आदर्श’ वारसा

महाराष्ट्रनगरचा ‘आदर्श’ वारसा

googlenewsNext

- लीनल गावडे, मुंबई

लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने गणेशोत्सव सुरू केला अगदी त्याच उद्देशाने गेल्या ४८ वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करीत महाराष्ट्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पारंपरिकतेचा वारसा जपला आहे.
भांडुप पश्चिम येथील महाराष्ट्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साधेपणा जपत गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. कोणताही अधिक खर्च न करता गेली कित्येक वर्षे मंडळ गणेशोत्सव साजरा करीत आहे. विशेष म्हणजे पर्यावरणपूरक प्रकल्प या मंडळाद्वारे राबविले जातात. गणेशोत्सवातील दहा दिवस येथे विविध उपक्रम राबविण्यात येतात. गणेशोत्सवाचे बाजारीकरण न करता ‘उत्सव’ म्हणून तरुणांनी साजरा करावा यासाठी मंडळाने साधेपणा जपला आहे. येथील तरुणांनी परंपरा टिकवून ठेवली आहे.
दहा दिवस गणरायाची सेवा करण्यासाठी मंडळातील प्रत्येक गटातील रहिवासी आवर्जून सहभागी होत असतात. त्यामुळे येथील उत्सवाला आणखी हुरूप मिळतो, असे येथील रहिवासी आवर्जून सांगतात. यंदा महोत्सवाचे ४९वे वर्ष असून, यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करायचा, असा निर्धार मंडळाने केला आहे. (प्रतिनिधी)

असा झाला उत्सवाचा श्रीगणेशा
महाराष्ट्रनगर उत्सव मंडळाच्या माध्यमातून १९६९ साली पहिल्यांदा बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यापूर्वी येथील महाराष्ट्रनगर सार्वजनिक उत्सव मंडळ शाळेच्या छोट्या खोलीत बाप्पा बसविला जात होता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. पुढे कालांतराने याला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले.

डीजे नाहीच
डीजेची क्रेझ कितीही असली तरी मंडळ गणेशोत्सवादरम्यान कधीही डीजे वाजवत नाही. तरुणाईने पारंपरिक पद्धतीनेच सण साजरे करायचे ठरविल्यामुळे पारंपरिक वाद्याने बाप्पाचे स्वागत केले जाते. त्यातच उत्सवाची खरी मजा असते, असे येथील रहिवासी सांगतात. ध्वनिप्रदूषणा सोबतच इतर प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाते.

महिलांचा सहभाग
मंडळातील महिला बाप्पाच्या सेवेसाठी तत्पर असतात. बाप्पा येण्याच्या आधीपासूनच येथे तयारीला उधाण आलेले असते. आरतीसाठी महिलांचा उत्साह पाहण्यासारखा असतो. मंडळातील प्रत्येक घरातील महिला आरतीसाठी उपस्थित असतात. यानिमित्ताने महिलांना अनेक उपक्रमांमध्ये सहभागी होता येते.

विविध उपक्रम : गणेशोत्सवादरम्यान विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, स्मरणशक्ती स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. तसेच दहा दिवस विशेष कार्यक्रम राबविले जातात. यातही विविध वयोगटातील व्यक्ती सहभागी होतात.

पर्यावरणपूरक सजावट
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी येथे दरवर्षी पर्यावरणपूरक सजावट केली जाते. सजावटीसाठी पुठ्ठ्यांचा व कागदांचा वापर केला जातो. विशेष म्हणजे मंडळातील प्रत्येक जण सजावटीसाठी मदत करतो. त्यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो.

दरवर्षी गणेशोत्सव वेगळेपणाने साजरा करण्याचा मानस असतो. अगदी साधेपणाने पण मोठ्या उत्साहात सारे जण यात सहभागी होतात. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून येथील रहिवाशांचा एकोपा टिकून आहे.
- मिलिंद भगत, अध्यक्ष

Web Title: Maharashtraanagar's 'ideal' legacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.