Join us

सिडकोच्या ९० हजार घरांचा महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त टळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2019 4:39 AM

लोकसभा निवडणुकीचा परिणाम : निविदा प्रक्रिया रखडली

नवी मुंबई : सिडकोच्या बहुप्रतिक्षित ९० हजार घरांचा मुहूर्त टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महत्त्वाकांक्षी गृहप्रकल्पाची योजना महाराष्ट्र दिनी जाहीर करण्याची सिडकोची योजना होती, त्यानुसार जय्यत तयारीही सुरू करण्यात आली होती. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया रखडल्या आहेत. परिणामी, या घरांची घोषणाही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिडकोने गेल्या वर्षी १५ हजार घरांची योजना जाहीर केली. अल्प उत्पन्न आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या या गृहप्रकल्पातील घरांसाठी ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रभरातून सुमारे दोन लाख अर्ज दाखल झाले होते. घरांची वाढती मागणी लक्षात घेऊन सिडकोने आणखी ९० हजार घरे निर्माण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ८९ हजार ७७१ घरांचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, यातील बहुतांशी घरे सर्वसामान्य ग्राहकांना समोर ठेवून उभारली जाणार आहेत. यातील सर्वाधिक घरे दक्षिण नवी मुंबईत असणार आहेत. या गृहयोजनेच्या माध्यमातून बांधकाम सुरू असतानाच घरांची विक्री ही नवीन संकल्पना अमलात आणण्याचा निर्णय सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी घेतला आहे. त्यानुसार येत्या १ मे रोजी या नियोजित प्रकल्पातील घरांसाठी सोडत काढण्याची योजना तयार करण्यात आली होती. तशा सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या होत्या; परंतु १० मार्चपासून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाल्याने या गृहप्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला खो बसला आहे. परिणामी, महाराष्ट्र दिनी ९० हजार घरांची सोडत काढण्याच्या सिडकोच्या मनसुब्यावर पाणी फेरले गेले आहे. त्यामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना आता जून-जलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने घरांची निर्मितीसिडकोच्या प्रस्तावित ८९ हजार ७७१ घरांपैकी ५३ हजार ४९३ घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असणार आहेत. तर उर्वरित ३६ हजार २८८ घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने या घरांची निर्मिती करण्याची सिडकोची योजना आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पहिल्या टप्प्यातील कामांच्या निविदा रखडल्याने सोडतीसाठी निश्चित केलेला १ मेचा मुहूर्तही टळणार आहे.

टॅग्स :सिडकोमुंबईघर