‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून महाराष्ट्राची डिजिटल दौड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 01:32 AM2020-05-01T01:32:22+5:302020-05-01T01:32:31+5:30

तर ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आपल्या आणखी वेगळ्या पातळीवर नेणं शक्य आहे. त्यासोबतच बायोटेक्नॉलॉजी, आर्टीफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित उद्योग, व्यवसाय, उपक्रमांना आणखी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे लागेल.

Maharashtra's digital race through 'Work from Home' | ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून महाराष्ट्राची डिजिटल दौड

‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून महाराष्ट्राची डिजिटल दौड

Next

- संजीव पेंढारकर,
मुंबई :महाराष्ट्र एक प्रगतीशील राज्य आहे. ६0 वर्षांत उद्योगासह विविध क्षेत्रात महाराष्ट्राने मोठा पल्ला गाठलाय, हे वास्तवच आहे. तरीही प्रगतीसाठी प्रचंड संधी आणि मोठे क्षेत्र उपलब्ध आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आपल्या आणखी वेगळ्या पातळीवर नेणं शक्य आहे. त्यासोबतच बायोटेक्नॉलॉजी, आर्टीफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित उद्योग, व्यवसाय, उपक्रमांना आणखी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे लागेल.
राज्याने आजवर मोठी प्रगती केली असली तरी मुळात यश, प्रगती ही सापेक्ष संकल्पना आहे. या प्रगतीला आणखी अवकाश व्यापता येणार आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रात काही बदल संभवतात. ‘वर्क फ्रॉम होम’ हे त्याचेच एक उदाहरण आहे. आज कोरोनामुळे ज्या बाबी आपण करतोय त्या सवयीचा, समाजजीवनाचा भाग व्हायला हवा. सामान्य काळातही स्वच्छता, शारीरिक अंतराचे महत्त्व जाणायला हवे. त्यासाठी आवश्यक बाबींची तरतूद आस्थापनांनी करायला हवी. तहान लागली की विहीर खोदण्याच्या प्रवृत्तीला आता निरोप द्यायला हवे. आपत्कालीन स्थितीला आपण तयारच नसतो. याबाबत टाटांनी खूप छान मांडणी केली आहे. १८ महिने आपला धंदा, कंपनी चालूच होऊ शकली नाही, तरीही निभावता येईल, अशी व्यवस्था असायला हवी. असा आपत्कालीन निधी तयार हवा.
अतिरिक्त, अनावश्यक खर्च साधारण वेळेतही टाळायला हवेत. आम्ही ‘विको’मध्ये ही बाब आवर्जुन पाळतो; त्यामुळे स्ट्राईक असो किंवा आणखी एखादी आपत्ती, या काळात आम्ही गडबडून जात नाही. हतबल होत नाही. याशिवाय, मिलेनियर मार्इंडसेटच्या लेखकाने याची फार छान मांडणी केली आहे. १00 रुपये तुमच्याकडे येतील, त्याची टी-डब्लू-सी-जी-ओ अशा पाच भागांत विभागणी करायला हवी. यातला टी- म्हणजे टॅक्स, प्रत्यक्ष कर तुम्हाला द्यायचाच आहे. पुढे डब्ल्यू म्हणजे वेल्थ क्रियेशन, आलेल्या १00 रुपयांतून संपत्तीच्या निर्मितीसाठी एक भाग ठेवायला हवा. पुढचा सी हा चॅरिटाचा आहे. त्यासाठी एक हिस्सा ठेवायलाच हवा. अशा आपत्तीच्या काळात उद्योगांनी दाखविलेली सामाजिक बांधीलकी ग्राहक, लोक नक्कीच लक्षात ठेवतात. संकटकाळात हा उद्योग आपल्या मदतीला धावला, हा भावनिक धागा भविष्यात महत्त्वाचा ठरतो. बाकी दोन भाग यातला ‘जी’ हा जनरल कॉस्ट आणि ‘ओ’ आॅपरेशनल कॉस्टचा असतो. एकूणच आपत्कालीन निधी ते मिलेनियर मार्इंडसेटच्या माध्यमातून उद्योगांनी स्वत:ला तयार ठेवायला हवे.
(शब्दांकन : गौरीशंकर घाळे)
>किमान सकारात्मकता हवी !
एक महत्त्वाचा विषय राहतो तो म्हणजे शासनाचा. सरकारने पाहायची महत्त्वाची बाब म्हणजे उद्योगांना कमीतकमी त्रास होईल, असे वातावरण तयार करायला हवे. म्हणजे कर निर्धारण, कर भरणा, कर परतावा सुलभ होईल हे पाहायला हवे.
सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवूनही परतावे मिळत नाहीत, ही स्थिती असता कामा नये. परवानग्यांसाठी १0 ठिकाणी हिंडायची गरज लागता कामा नये. एक खिडकी योजना प्रत्यक्षात आणि परिणामकारक अंमलबजावणी करायला हवी. वेठीस धरणारी चौकट मोडता आली तर उद्योगांसाठी याहून मोठी बाब नसेल.
कोरोनानंतर ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणा किंवा डिजिटल आॅफिसची संकल्पना रूळायचा प्रयत्न करेल तेव्हा आवश्यक पायाभूत, पूरक व्यवस्था सक्षम करायला हवी. या बाबतीत किमान सकारात्मकता प्रत्यक्षात आणली तरी महाराष्ट्राच्या प्रगतीचा वारू दौडतच राहील.
(संचालक, विको लॅबोरेटरीज)

Web Title: Maharashtra's digital race through 'Work from Home'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.