मुंबई-
महाराष्ट्रातील पहिलं दृष्टीहीन गोविंदा पथक म्हणून ओळख असलेल्या मुंबईतील नयन फाऊंडेशनच्या गोविंदा पथकाला यंदा १२ वर्ष पूर्ण झाली आहेत. नयनच्या छताखाली एकवटल्याने फाऊंडेशन एक तप पूर्ण करून वाटचाल कायम राखली आहे. दृष्टीहीन आणि अंशतः दृष्टीहीन तरूणाना ट्रेकिंग करता यावी, या साध्या-सोप्या उद्देशासाठी फाऊंडेशनने काम सुरू करण्यात आले होते. महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे २०१० मध्ये नयनची स्थापना झाली. ट्रेकिंगनंतर, बुध्दीबळ स्पर्धा, योग प्रात्यक्षिके अशी कार्यक्रमांची आखणी केली.
२०१३ मध्ये एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकाने आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात नयन फाऊंडेशनने पहिल्यांदा मानवी थर रचले. दृष्टीहिनाचे साडे तीन थर रचत नयन फाऊंडेशन गोविंदा पथकाचा नारळ वाढवला. २०१७ मध्ये तरुणीनी थर रचण्यास सुरुवात केली. २०१९ मध्ये नयनच्या दृष्टीहीन तरुणाने पहिल्यादा पाच कडक थर रचत सलामी दिली, असे संस्थेचे अध्यक्ष पोन्न अलगर देवेंद्र यांनी सांगितले. पोन्न अलगर हे स्वतः अंशतः दृष्टीहीन आहेत.
रुईया महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संस्थेचे स्वयंसेवक आहेत. यामुळे रुईया नाका/ पार्किंग येथेच फाऊंडेशनच्या बैठका पार पडतात. दडकर मैदानात दहीहंडीचा सराव होतो. अंध विद्यार्थ्यांना परीक्षेत रायटर्स पुरवणे, तरुणांसाठी क्रिकेटचे सामने, तरुणीना स्वसंरक्षणासाठी प्राथमिक तायक्वांदो प्रशिक्षण असे उपक्रम संस्थेने राबवली आहेत.
दहीहंडी उत्सवातील बक्षीस रक्कमेचा एक वाटा दृष्टीहीन / अंशतः दृष्टीहीनांना समान वाटला जातो. दुसऱ्या वाट्यातून गोविंदाना ट्रेकिंगला घेऊन जाते. गड-किल्ल्यावर ट्रेकिंग करण्याचा अट्टाहास फाऊंडेशनच्या तरुणांचा असतो. भविष्यात स्वयंसेवकांच्या मार्गदर्शनात दृष्टीहीनाचा हात हातात घेऊन विविध सामाजिक उपक्रमाने सामाजिक भान जपण्याचा मानस संस्थेचा आहे.