Join us

कंगना-शिवसेना वादावर न बोलताही, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात सगळं सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2020 1:48 PM

महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून, वेळ आल्यावर मी या राजकारणावरही बोलणार आहे

ठळक मुद्देमहाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय. मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून, वेळ आल्यावर मी या राजकारणावरही बोलणार आहे

मुंबई - राज्यात कोरोनाच्या फैलावाला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील जनतेशी सातत्याने संवाद साधणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. राज्यातील कोरोनाबाधितांचा वाढता आकडा, मराठा आरक्षणाला मिळालेली तात्पुरती स्थगिती आणि कंगना व शिवसेना यांच्यात पेटलेला वाद यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय बोलतात, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या सुरुवातीलाच कंगना  व शिवसेना वादावर अप्रत्यक्षपणे बाण चालवला. कुणाचेही नाव न घेता, मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात आपली बाजू मांडत, राजकारण सांगितलं.  

'महाराष्ट्राच्या बदनामीचा डाव आखला जातोय', मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही की शांत आहे. मी मुख्यमंत्री पदावर बसलेलो आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून, वेळ आल्यावर मी या राजकारणावरही बोलणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं. सध्या विषय कोरोनाचा आहे, त्यामुळे कोरोना व त्यावरील उपाययोजना याबाबत मुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केले. माझे कुटुंब-माझी जबाबदारी याचं पालन करण्याचंही उद्धव ठाकरेंनी केलं. 

'तुम्ही खबरदारी घ्या, मी जबाबदारी घेतो' असं मी यापूर्वी म्हटलं आहे. पण आता मी तुमच्यावरही जबाबदारी टाकत आहे. आपण आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यायची आहे. माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही योजना सुरु करत आहोत. कोरोनावर मात करण्यासाठी ही नवी मोहीम असल्याचं त्यांनी म्हटलं. राज्यातील 12 कोटी जनतेची चाचणी अशक्यप्राय, प्रत्येक घरात आरोग्याची चौकशी करायला दोन वेळा टीम जाईल, प्रत्येक लोकप्रतिनिधीने जबाबदारी घ्यावी, सरपंचांपासून ते नगरसेवक, आमदार-खासदारांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, विभागवार कार्यक्रमाची आखणी करावी, असे उद्धव ठाकरेंनी म्हटलं. 

कुटुंबातील 50-55 वर्षावरील व्यक्तीची ऑक्सिजन मात्रा आणि अन्य व्याधी / लक्षणांची माहिती घ्या व यंत्रणेस कळवा. फेस टु फेस बोलु नका. ऑनलाइन खरेदीवर भर द्या. दुकानात गर्दी करू नका, सॅम्पलना हात लावू नका. सार्वजनिक वाहनातून फिरताना बोलू नका. ऑक्सिजन कमतरता जाणवत आहे.. त्यामुळे 80% ऑक्सिजन हा प्रथम आरोग्य सेवेसाठी देणार, उद्योगासाठी देण्यास दुय्यम महत्त्व देण्यात येणार. नगरसेवक, आमदार, खासदार सगळ्या लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या विभागाची जबाबदारी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. 

कंगना- शिवसेना वादावर अप्रत्यक्षपणे बोलले

राज्यातील जनतेला संबोधित करताना सध्या गाजत असलेल्या कंगना- शिवसेना वादावर मुख्यमंत्री भाष्य करणार की त्याला बगल देणार याची चर्चाही सुरू होती.  मात्र, कुणाचेही नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव साधला जातोय, असे म्हणत या वादावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. आपल्या भाषणातील एका वाक्यातच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची बाजू मांडल्याचे दिसून येत आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलिसांवर करण्यात आलेली टीका आणि अभिनेत्री कंगना राणौतने मुंबईची केलेली पीओकेशी तुलना यानंतर शिवसेनेने मराठी अस्मितेचा मुद्दा आक्रमकपणे समोर आणला आहे. तसेच शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या अनधिकृत कार्यालयावर हातोडा चालवल्याने वाद अधिकच पेटला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हकडे राज्याचे लक्ष लागले होते.

कंगना राज्यपालांच्या भेटीला

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई पोलीस आणि ठाकरे सरकारवर केलेली जहरी टीका आणि मुंबईची पीओकेशी तुलना केल्याने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत वादात सापडली असून, मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी तिच्या कार्यालयातील अनधिकृत बंधकामावर कारवाई केली होती. त्या पार्श्वभूमीवर कंगना राणौत आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. या भेटीमध्ये कंगना आपल्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत राज्यपालांकडे तक्रार करण्याची शक्यता आङे.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रशिवसेनाकोरोना वायरस बातम्याउद्धव ठाकरे