सांगूनही न ऐकणाऱ्या ३८८ बिल्डरांना महारेराचा दणका, प्रकल्प नोंदणी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 06:06 AM2023-09-19T06:06:56+5:302023-09-19T06:07:08+5:30
बँक खातेही गोठविणार; घरांची विक्री करण्यावरही घातली बंदी
मुंबई : बांधकामावस्थेत असलेल्या इमारतीची सद्य:स्थिती काय, आराखड्यात काही बदल झाले का, किती सदनिकांची नोंदणी झाली, किती पैसे जमा झाले, किती खर्च झाले इ. इ. तपशील संकेतस्थळावर नोंदणे बंधनकारक असतानाही त्याकडे काणाडोळा करणाऱ्या ३८८ बिल्डरांना महारेराने दणका दिला आहे. त्यांच्या प्रकल्पांची नोंदणीच स्थगित करण्याचा निर्णय महारेराने घेतला आहे.
नियमानुसार आपल्याकडील तपशील बिल्डरांनी महारेराच्या संकेतस्थळावर नोंदवणे बंधनकारक आहे. जानेवारीत नोंदविलेल्या ७४६ प्रकल्पांनी २० एप्रिलपर्यंत वरीलप्रमाणे माहिती देणे गरजेचे होते. परंतु त्याची पूर्तता न झाल्याने संबंधित बिल्डरांना प्रकल्पाची नोंदणी रद्द वा स्थगित का केली जाऊ नये, या आशयाची नोटीस बजावण्यात आली. त्याकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या ३८८ बिल्डरांवर कारवाईचा बडगा महारेराने उगारला.
‘महारेरा’च्या निर्णयामुळे काय?
प्रकल्पांची बँक खाती गोठविण्यात येत आहेत.
प्रकल्पाची जाहिरात, पणन, सदनिकांची विक्री असे काहीही करता येणार नाही.
प्रकल्पातील कुठल्याही विक्री व्यवहाराची व साठेखताची नोंदणी न करण्याचे निर्देश उपनिबंधकांना देण्यात आले आहेत.
कारवाई का केली?
प्रकल्पांत गुंतवणूक केलेल्या किंवा करणाऱ्या ग्राहकाला घरबसल्या ही माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी ही तरतूद आहे.
ग्राहकांप्रती बिल्डरांची उदासीनता म्हणजे ग्राहकांच्या हक्काचा अधिक्षेप आहे, असे गृहीत धरून कारवाई करण्यात आली.