मुंबई - घरखरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी ग्राहक तक्रार निवारण कक्षांची स्थापना करावी, असे निर्देश महारेराने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये दिले होते. त्याचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील फक्त 195 प्रकल्पांनी अशा कक्षांची स्थापना करून अपेक्षित तपशील संकेतस्थळावर नोंदवल्याचे निदर्शनास आले आहे. विकासकांच्या ग्राहकांप्रती या उदासीनतेची महारेराने गंभीर नोंद घेतली असून विकासकांनी प्रत्येक प्रकल्पासाठी ग्राहक तक्रार निवारण कक्ष स्थापन करावे, यासाठी महारेरा विशेष प्रयत्न करणार आहे.
सुरूवातीला घर खरेदी करताना किंवा नोंदणी करताना प्रकल्पाची पणन यंत्रणा ग्राहकांच्या संपर्कात असते. नंतर काही तक्रारी असल्यास, अडचणी आल्यास कुणाशी संपर्क साधावा हे अनेक प्रकल्पांत निश्चित केलेले नसते. अशावेळी त्या ग्राहकाने कुठे जावे हे त्याला कळत नाही . परिणामी त्याची तक्रार सोडवून घेण्यात त्याला अडचणींना सामोरे जावे लागते . यातून अनेकदा अधिकृतपणे विश्वासार्ह माहिती मिळत नसल्याने गैरसमज निर्माण होऊन तक्रारी वाढतात. त्यातून प्रकल्प पूर्णतेतही अडचणी येऊ शकतात. ही वस्तुस्थिती लक्षात घेता
घर खरेदीदारांच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्व विकासकांनी आपापल्या प्रकल्पांसाठी तक्रार निवारण कक्षाची स्थापना करावी, असे निर्देश महारेराने एका परिपत्रकाद्वारे सर्व विकासकांना दिले होते. या कक्षात याच कामासाठी समर्पित किमान एक तक्रार निवारण अधिकारी असावा आणि त्याचे नाव, संपर्क क्रमांक प्रकल्प स्थळी ठळकपणे प्रदर्शित करावे. शिवाय विकासकाच्या संकेतस्थळावरही ते ठळकपणे उपलब्ध असावे, अशीही सूचना महारेराने केलेली होती.
समर्पित तक्रार निवारण कक्षांमुळे तक्रारदाराला वेळीच अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती मिळायला मदत होईल. शिवाय विकासकांनी किती तक्रारी आल्या, किती तक्रारींचे निवारण केले ,याचा तपशीलही संकेतस्थळावर टाकल्यास प्रकल्पाची विश्वासार्हता वाढायलाही मदत होईल. ग्राहकांच्या तक्रारींचे रितसर निवारण व्हावे, ग्राहकाला आपली गुंतवणूक संरक्षित आणि सुरक्षित आहे असा विश्वास वाटावा आणि स्थावर संपदा क्षेत्राची विश्वासार्हता आणखी वाढावी, यासाठी या ग्राहक तक्रार निवारण कक्षांची स्थापना ही काळाची गरज आहे. महारेरा त्यासाठी कटिबद्ध आहे.
सेवाक्षेत्रात विश्वासार्हता निर्माण होणे, व्यवसायाच्या वृध्दीसाठी ती सतत वाढती राहणे आवश्यक असते. गृहनिर्माण निर्माण क्षेत्र आतापर्यंत केवळ फक्त एक वास्तुक्षेत्र म्हणून ओळखले जायचे. आता हे क्षेत्र सेवाक्षेत्र म्हणूनही वृध्दींगत व्हायला लागले आहे. अशावेळी तक्रार निवारण यंत्रणा अस्तित्वात असणे ही काळाची गरज आहे. हे वास्तव लक्षात घेऊनच महारेराने प्रत्येक प्रकल्पात तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले होते. काळाची गरज लक्षात घेऊन हे या दृष्टीने क्षेत्र समर्थपणे वृध्दींगत व्हावे आणि या क्षेत्राची विश्वासार्हता वाढावी यासाठी सर्व संबंधितांनी याबाबत तातडीने कारवाई करावी, असे आवाहन महारेराच्यावतीने करण्यात येत आहे. - अजय मेहता, अध्यक्ष, महारेरा