मुंबई - लोकसंघर्ष संघटनेचा उलगुलान मोर्चा आझाद मैदानात दाखल झाला आहे. वनाधिकार कायदा आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दुष्काळ निवारण, आदिवासी समस्या आणि कर्जमाफी अशा प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी आणि आदिवासींनी हा मोर्चा काढला आला आहे. ठाणे, पालघर, भुसावळ जिल्ह्यातील आदिवासी आणि मराठवाड्यातील शेतकरी आपल्या प्रलंबित मागण्या घेऊन या मोर्चात सहभागी झाले आहेत. शेतकरी-आदिवासींचं उलगुलान मोर्चाचं वादळ बुधवारपासून मुंबईवर घोंघावत आहे. पण 'उलगुलान' या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे?, हे जाणून घेऊया...
'उलगुलान' म्हणजे काय?
'उलगुलान' म्हणजे प्रस्थापितांविरुद्धचे बंड, एल्गार, महासंग्राम किंवा उठाव. काही आदिवासींनी 'उलगुलान'चा अर्थ हल्लाबोल असा सांगितला. तर हिंदी भाषेत या शब्दाचा अर्थ भारी कोलाहल आणि उथलपुथल असा आढळून आला.
(Maharashtra Farmer's Protest LIVE : शेतकरी आणि आदिवासींचा उलगुलान मोर्चा आझाद मैदानात दाखल)
'उलगुलान' हा शब्द कुठून आला? - आदिवासींचे आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी पुकारलेल्या क्रांती व बंडावेळी त्यांनी 'उलगुलान' आंदोलनाची हाक दिली होती. सन 1869 मध्ये वन संरक्षण कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे जंगलांवर होणारी सर्वसामान्यांची उपजीविका बंद झाली.
- आदिवासींसमोर मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्ध बिरासांनी 1890मध्ये व्यापक क्रांती 'उलगुलान 'ची घोषणा केली
- बिरसांनी 1895 मध्ये जंगल, जमीन संपत्ती यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येवून लढायचे आवाहन केले. ते आदिवासींचे महानायक बनले.
- याविरोधात इंग्रज सरकार त्यांच्या मागे लागले. पण त्यांनी आपला लढा कायम ठेवला. बिरसा आणि त्यांच्या अनुयायांनी अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावून दिली. याप्रकरणी 1895 साली बिरसा व त्यांच्या वडिलांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यांना 2 वर्षांचा कारावास आणि दंड ठोठावण्यात आला.
- 30 नोव्हेंबर 1897 रोजी बिरसा तुरुंगातून बाहेर आले. यावेळी आदिवासी समाजाची स्थिती पाहून त्यांनी पुन्हा 'उलगुलान'ची घोषणा केली.