दिव्यांगांना मोफत उपकरणांसाठी 'महाशरद' डिजिटल प्लॅटफॉर्म
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 05:59 AM2020-12-12T05:59:42+5:302020-12-12T06:00:17+5:30
Mahasharad : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना लागणारी सहायक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी 'महाशरद' या डिजिटल प्लॅटफाॅर्मचे लोकार्पण करण्यात येणार आहे,
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना लागणारी सहायक उपकरणे मोफत उपलब्ध करून देण्यासाठी 'महाशरद' या डिजिटल प्लॅटफाॅर्मचे लोकार्पण करण्यात येणार आहे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे 'ई-बार्टी' या मोबाइल ॲपचेही लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती, सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्यमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
बाजारात ब्रेल किट, श्रवण यंत्र, कृत्रिम अवयव, बॅटरीवर चालणारी व्हीलचेअर असे दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार अनेक प्रकारची सहायक उपकरणे उपलब्ध असतात, परंतु प्रत्येकाला ती विकत घेणे शक्य होत नाही, तसेच समाजात अनेक दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था, खासगी कंपन्या, उद्योजकांसह अनेक घटक दिव्यांग व्यक्तींना असे उपकरण देण्यासाठी इच्छुक असतात. या गरजू दिव्यांग व्यक्तींची आणि दात्यांची सांगड घालून देण्याचे काम ‘महाशरद’ या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून केले जाणार आहे. महाशरद प्लॅटफॉर्म वर नोंदणी करण्यासाठी www.mahasharad.in हे संकेतस्थळ १२ डिसेंबरपासून सुरू होत असून, मार्च अखेरपर्यंत मोबाइल ॲप्लिकेशन स्वरूपातही हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती मुंडेंनी दिली. त्याचप्रमाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) चे मोबाइल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या ॲपमध्ये एम - गव्हर्नन्ससहित, बार्टीतील सर्व योजना, इ-लायब्ररी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, अधिछात्रवृत्ती योजना आदी सर्व योजना एका क्लिकवर मोबाइलवरून हाताळता येणार आहेत. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी, तक्रार निवारण, अभिप्राय आदी सुविधांसह विविध जातीच्या सर्वेक्षणासाठी लागणारी माहिती संकलित करण्यासाठीही हे ॲप्लिकेशन उपयुक्त ठरणार असल्याचे मुंडे म्हणाले.