लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनने आयोजित केलेला सांस्कृतिक सोहळा प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत अव्वल ठरला आहे. जगभरातील १३० देशातील दोन कोटीहून अधिक प्रेक्षकांनी फेसबुकसह विविध समाजमाध्यमांवर थेट प्रक्षेपित सोहळा पाहिला.
जगभरात थेट प्रक्षेपित कार्यक्रमांच्या प्रेक्षकसंख्येची आकडेवारी ‘पोलस्टार’ या संस्थेकडून जारी केली जाते. पोलस्टारने नुकतेच मार्च महिन्यातील साप्ताहिक आकडेवारी जाहीर केली आहे. यात दोन कोटीहून अधिक प्रेक्षक संख्येसह ईशा फाऊंडेशनच्या महाशिवरात्रीचा कार्यक्रम अव्वल ठरला आहे. कोयंबतूरमधील ईशा योग केंद्रातून ११ मार्चला सायंकाळी सुरू झालेला महाशिवरात्रीचा कार्यक्रम १२ मार्चच्या पहाटेपर्यंत सुरू होता. विविध कलाकारांनी यावेळी संगीत, नृत्यांचे आविष्कार सादर केले. यासोबतच ध्यान-धारणा आणि मंत्रोच्चारांचे सत्रही आयोजित करण्यात आले होते. सदगुरू जग्गी वासुदेव यांच्यासह दाक्षिणात्य कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. महाशिवरात्रीचा हा सोहळा मार्च महिन्यात १३० देशांतील लोकांनी पाहिलेला जागतिक स्तरावरील सर्वात मोठा कार्यक्रम ठरला. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रेक्षकसंख्येच्या पहिल्या ५० कार्यक्रमातील हा एकमेव भारतीय सोहळा ठरला. पोलस्टारच्या यादीत ६३वा ग्रॅमी पुरस्कार प्रेक्षकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. १ कोटी ३५ लाख लोकांनी हा कार्यक्रम पाहिला.
महाशिवरात्रीला सोहळ्याला लाभलेल्या अफाट प्रेक्षकसंख्येबाबत ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव म्हणाले की, आपल्या अंतरंगात डोकावणे, हाच सर्व समस्यांच्या समाधानाचा मार्ग आहे. अन्य कुठलाच मार्ग नाही. या मूलभूत जाणीवेचेच ''आदियोगी'' प्रतीक आहेत. महाशिवरात्री उत्सवाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद म्हणजे, शेवटी जगाने अंतर्मुख होऊन मानवी गरजा, शक्यतांकडे लक्ष देण्यास दाखविलेली तयारीच असल्याचे सांगत या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे सदगुरूंनी आभार मानले.
दरवर्षी महाशिवरात्रीला लाखो लोकांच्या उपस्थितीत ईशा फाऊंडेशनचा उत्सव पार पडतो. दरवर्षी जगभरातून लाखो लोक ईशा योग केंद्रात महाशिवरात्रीच्या सोहळ्या दरम्यान जमतात. मात्र, यंदा कोरोनामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमांमुळे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मात्र, त्याचे विविध सामाजिक माध्यमाद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. १५ हून अधिक भाषेत हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता.