महात्मा गांधीजींचे वास्तव्य असलेल्या भवनाची दुरवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2019 05:15 AM2019-02-03T05:15:08+5:302019-02-03T05:15:20+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक वारसा बनलेल्या बोरीवलीतील कोरा केंद्रातील महात्मा गांधी भवन सध्या उपेक्षित झाले आहे.

Mahatma Gandhi Bhavan news | महात्मा गांधीजींचे वास्तव्य असलेल्या भवनाची दुरवस्था

महात्मा गांधीजींचे वास्तव्य असलेल्या भवनाची दुरवस्था

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्यामुळे ऐतिहासिक वारसा बनलेल्या बोरीवलीतील कोरा केंद्रातील महात्मा गांधी भवन सध्या उपेक्षित झाले आहे. या भवनाची दुरवस्था झाल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. गांधी भवन हे जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येत असून, प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. सरकारला येथून ११ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळते, तरीदेखील या वास्तूची दुरवस्था का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

कोरा केंद्रामध्ये महात्मा गांधींचे कुटीर आहे. येथे गांधी अधून-मधून यायचे. त्यामुळे बोरीवलीतील गांधी भवन हे एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. गांधीच्या प्रवासातले क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून टिपले असून, त्याचे ‘फोटोग्राफी म्युझियम’ येथे आहे.
भवनात महात्मा गांधींच्या चरख्यापासून सर्व साहित्य ठेवण्यात आले आहे़ मात्र, आता गांधी भवनाच्या वास्तूची दुरवस्था झाली आहे. वास्तूच्या छतावरील कौले पडली आहेत़ भवनातील जमिनीला तडे गेले आहेत. भिंतीही एका बाजूला कलंडलेल्या स्थितीमध्ये आहेत. पावसाळ्यात गांधी भवनाला चारही बाजूने प्लॅस्टिक बांधावे लागते.

भेट देणाºयांची संख्याही अल्प

प्रशासनाने गांधी भवनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिथे भेट देणाºयांची संख्याही अल्प असते. आजूबाजूच्या परिसरात शाळा आणि महाविद्यालय असूनही गांधी भवनात विद्यार्थ्यांना नेले जात नाही. ३० जानेवारीला गांधीजींची पुण्यतिथी होती, या वेळी गांधी भवनाला हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतक्याच लोकांनी भेट दिली.

गांधी भवनाच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी, खासदार गोपाळ शेट्टी, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, अशी माहिती समाजसेवक विक्रम चोगले यांनी दिली.

आमच्याकडे गांधी भवनाच्या दुरुस्तीबाबत पत्र आले आहे, परंतु खादी ग्रामउद्योग विभागाकडे गांधी भवनाच्या दुरुस्ती करण्याचे काम आहे. दुरुस्तीसाठी लागणारी परवानगी ही महापालिकेकडून घेतली जाते. संबंधितांनी महापालिकेलाही पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातल्या एका अधिकाºयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितली.

Web Title: Mahatma Gandhi Bhavan news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई