महात्मा गांधी केवळ भारतासाठी नव्हे तर जगासाठी मार्गदर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 07:29 AM2019-04-12T07:29:05+5:302019-04-12T07:29:13+5:30

सौदी अरेबियाच्या राजदूतांचे प्रतिपादन : भारत, सौदीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य करण्याची ग्वाही

Mahatma Gandhi is not just for India, but for the world | महात्मा गांधी केवळ भारतासाठी नव्हे तर जगासाठी मार्गदर्शक

महात्मा गांधी केवळ भारतासाठी नव्हे तर जगासाठी मार्गदर्शक

Next

मुंबई : महात्मा गांधी हे केवळ भारताचे नसून त्यांचे विचार संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक आहेत, असे प्रतिपादन सौदी अरेबियाचे राजदूत डॉ. सऊद बिन मोहम्मद अल साती यांनी केले. भारत व सौदी अरेबियामधील विद्यार्थ्यांना एकमेकांच्या देशात शिकण्यासाठी अधिकाधिक संधी व सहकार्य करण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.


डॉ. सऊद म्हणाले, गांधीजींनी जगाला शांततेचा व सर्वांशी मिळूनमिसळून राहण्याचा संदेश दिला आहे. गांधीजींवर प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विचारांचा मोठा पगडा होता. गांधीजींच्या विचारांचे पालन करून त्याप्रमाणे आचरण करणे ही काळाची गरज आहे. गुरुवारी मुंबई सेंट्रल येथील अंजुमन इस्लामच्या सैफ तय्यबजी मुलींच्या शाळेतील सभागृहाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते. या वेळी अंजुमनचे अध्यक्ष डॉ. जहीर काझी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिन सय्यद यांनी केले.


भारत व सौदीमधील संबंध चांगले असून ते अधिकाधिक वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन डॉ. सऊद यांनी या वेळी दिले. गांधीजींनी शिक्षण, परिश्रम व स्वयंशिक्षणाचे महत्त्व संपूर्ण जगाला पटवून दिले. मुलांसोबतच मुलींंच्या शिक्षणालाही प्राधान्य देणे, ही काळाची गरज आहे. आजच्या युगातील बदलत्या काळाची ही गरज लक्षात घेऊन मुलांसह मुलींच्याही शिक्षणासाठी हातभार लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


मक्का, मदिना या शहरांमध्ये जाण्यासाठी भरावे लागणारे शुल्क आॅनलाइन भरण्यासंदर्भात सुविधा पुरवण्यात आल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली. या धार्मिक शहरांमध्ये ३ कोटी नागरिक भेट देऊ शकतील अशी तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी डॉ. जहीर काझी यांनी अंजुमन इस्लामच्या प्रवासाबाबत माहिती दिली. १२० विद्यार्थ्यांसह १८७४ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेमध्ये सध्या १ लाख १० हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी शिकत असून त्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी कौतुकाने सांगितले.

मुलींचे प्रमाण अधिक
डॉ. जहीर काझी यांनी अंजुमन इस्लामच्या प्रवासाबाबत माहिती दिली. १२० विद्यार्थ्यांसह १८७४ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेमध्ये सध्या १ लाख १० हजार विद्यार्थी, विद्यार्थिनी शिकत असून त्यामध्ये मुलींचे प्रमाण जास्त असल्याचे त्यांनी कौतुकाने सांगितले.

Web Title: Mahatma Gandhi is not just for India, but for the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.