Join us  

Chandrakant Patil: "महात्मा गांधी देश फिरले, उद्धव ठाकरेंना वाटतं मातोश्रीत राहूनच लोकांची दु:ख कळतात"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 12:11 PM

दोन विरोधी पक्ष असतात ते बऱ्याच वेळेला विचारांच्या आधारे विरोधी असतात. त्यामुळे विचाराची लढाई लढली पाहिजे.

मुंबई - राज्यात परतीच्या पावसामुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी विरोधक आग्रही तसेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यानंतर आदित्य ठाकरे (Aaditay Thackeray) यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. उद्धव ठाकरेंनी थेट बांधावर पोहोचल्यानंतर आता भाजपसह शिंदे गटाकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही महात्मा गांधींचं उदाहरण देत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. 

दोन विरोधी पक्ष असतात ते बऱ्याच वेळेला विचारांच्या आधारे विरोधी असतात. त्यामुळे विचाराची लढाई लढली पाहिजे. आदित्य ठाकरे आणि उध्दव ठाकरे यांना हे उशिरा समजलं, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला टोला लगावला. तसेच, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुनही त्यांनी महात्मा गांधींचं उदाहरण देत त्यांच्यावर बोचरी टीका केली. देशात महात्मा गांधी यांच्यासारखे नेते निर्माण झाले. कारण, ते देश फिरले, सर्वसामान्य माणसांशी त्यांनी संवाद साधला. पण, उध्दव ठाकरेंना वाटत की, मातोश्रीमध्ये राहुनच लोकांची दु:ख कळतात. आता त्यांना साक्षात्कार झाला आहे, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ज्या गोष्टी आपण सत्तेत असताना केल्या नाहीत याची आठवण असायला पाहिजे. विरोधी पक्षाची दखल सत्ताधारींनी घेतली पाहिजे. त्यामुळे ती घेतली जाईल. लोकशाहीमध्ये ईच्छा व्यक्त केली तर त्यात काही चुकीचं नाही आहे, असेही पाटील यांनी म्हटले. 

टॅग्स :चंद्रकांत पाटीलभाजपाउद्धव ठाकरे